कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता शहराच्या विविध भागातील विजेचे खांब, पालिका, सार्वजनिक मालमत्तांवर जाहिरातीचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या तीन जाहिरातदारांवर पालिकेच्या क प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या तक्रारीवरुन बाजारपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा- विद्यार्थी जखमी झाल्याने शाळा संचालकाचे आंदोलन

आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिकेच्या परवानग्या न घेता पालिकेचे विद्युत खांब, रस्ता दुभाजक, पालिकेच्या मालमत्ता, स्कायवाॅक, वाहतूक बेटातील खांब याठिकाणी जाहिरातीचे फलक लावून शहर विद्रुप करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शहर स्वच्छ, सुशोभित राहिले पाहिजे यासाठी जे नागरिक, आस्थापना सार्वजनिक शहराच्या सुशोभिकरणाला बाधा येईल, अशा पध्दतीने पालिकेच्या परवानग्या न घेता फुकट जाहिरातबाजी करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश आयुक्त चितळे यांनी दिले आहेत.

हेही वाचा- ठाणे पालिकेतील अधिकारी आणि ठेकेदार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता

आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून १० प्रभाग हद्दीत बेकायदा फलक हटविण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. आतापर्यंत दोन हजाराहून अधिक फलक कारवाई पथकाने हटविले आहेत. कल्याण पश्चिमेतील क प्रभागाच्या हद्दीत आधारवाडी भागात सेंट झेविअर इंटरनॅशनल स्कूल, झोझवाला पेट्रोल पंपासमोर इंग्रजी संभाषणाचे आणि श्री देवी रुग्णालयासमोर आर्टिक काॅम्प्युटर एज्युकेशन संस्थांनी पालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावले असल्याचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, कारवाई पथकाचे गणेश दळवी यांना आढळून आले. हे फलक जमा करुन त्यांची नंतर विल्हेवाट लावण्यात आली. शहर स्वच्छतेचे अनेक उपक्रम पालिकेतर्फे राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर तीन आस्थापनांनी विनापरवानगी फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याने साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे या प्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

हेही वाचा- ठाणे : करोना ओसरल्यानंतरही नोंदणीपद्धतीने विवाहाला पसंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईला भाजपचा विरोध

जाहिरात फलकांवर पालिका अधिकारी सूडबुध्दीने कारवाई करत आहेत. सामान्य नागरिक विविध कार्यक्रम, जाहिरातींचे फलक लावतात. अशाच फलकांवर कारवाई आणि पालिकेकडून गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. गुन्हे दाखल करण्यापूर्वी संबंधित जाहिरातदारांना नोटिसा देण्यात याव्यात मग गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पवार यांनी केली आहे. कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांनी मात्र बेकायदा फलट हटाव मोहिमेचे जोरदार स्वागत केले आहे. पालिका अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.