उल्हासनगरमध्ये एका कुत्रीसह तिच्या पिल्लाला झाडाला लटकावून फाशी देण्यात आल्याचा निर्दयी आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्राणीमित्रांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील साईनाथ कॉलनी परिसरात बुधवारी १६ मार्च रोजी रात्री एका कुत्रीला आणि तिच्या पिल्लाला गळफास देऊन झाडाला लटकवण्यात आल्याची माहिती पीपल फॉर अनिमल संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी चुग यांना फोनद्वारे समजली. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी धाव घेत प्रकाराची माहिती घेतली. त्या ठिकाणी एक कुत्री आणि तिचे लहान पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या कुत्रीला आणि तिच्या लहान पिल्लाला निर्दयतेने आणि क्रूरतेने कुणी मारले याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेने प्राणीमित्रांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात झालेली ही तिसरी घटना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.