आई-वडील घरी दररोज जेवण बनविण्यास सांगतात हा राग डोक्यात ठेऊन काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेली उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलगी ठाण्यात सापडली आहे. जौनपूर जिल्ह्यात राहणारी निकिता मिश्रा ही १७ वर्षीय मुलगी ठाणे पोलिसांना तलावपाळी परिसरात आढळून आली. ठाणे पोलिसांनी जौनपूर पोलिसांच्या मदतीने निकिताच्या घरच्यांशी संपर्क साधत त्यांच्या समंतीने तिला मुंब्रा येथे राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या भिक्षेकरी शोध मोहिमेच्या दरम्यान हा प्रकार समोर आला आहे.

उत्तरप्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील शीतलगंज या गावात निकिता मिश्रा ही तरुणी आपल्या कुटुंबियांसमवेत राहते. निकिता १९ मे रोजी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी उत्तरप्रदेशातील मडियाहू या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे सध्या भिक्षेकरी शोधमोहीम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत काम करणारे अधिकारी आणि ठाणे शहर गुन्हे शाखेचे बाल संरक्षण विभागाचे अधिकारी यांना निकिता दोन दिवसांपूर्वी तलावपाळी येथे एका झाडाखाली बसलेली दिसून आली. त्यानंतर तिला बाल संरक्षण शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने उत्तरप्रदेश मधील शीतलगंज येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी तिला विश्वासात घेत तिची अधिक चौकशी केली असता आई-वडील घरी रोज जेवण बनविण्यास सांगतात याला कंटाळून आपण घर सोडून इकडे आले असल्याचेही तिने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकिताने जौनपूर ते ठाणे असा मोठा रेल्वे प्रवास करत ठाण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर ठाणे पोलिसांनी माडियाहू पोलिसांना संपर्क साधत निकिताबद्दल माहिती दिली. तेथून निकिताच्या कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांना पोलिसांनी संपर्क केला. निकिताची मोठी बहीण नेहा उपाध्याय या मुंब्रा येथे राहत असून तिला त्यांच्या स्वाधीन करण्याची कुटुंबीयांनी ठाणे पोलिसांना विनंती केली. त्यानुसार पोलिसांनी उपाध्याय यांच्याशी संपर्क साधून निकिताला त्यांच्या स्वाधीन केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या भिक्षेकरी शोध मोहिमेच्या माध्यमातून बालकामगार तसेच बेवारस बालकांची माहिती समोर येण्यास मदत होणार आहे.