डोंबिवली : गेल्या पंधरा दिवसांपासून डोंबिवली शहराच्या विविध भागात सकाळच्या वेळेत फिरणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या कल्याण मधील एका हाॅटेल व्यवस्थापकाला रामनगर पोलिसांच्या शोध पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली. या अटकेसाठी पोलिसांनी पंधरा दिवसाच्या कालावधीत ठाकुर्ली, चोळे, ९० फुटी रस्ता भागातील एकूण १७२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासले.

परेश किशोर घावरी (३५) असे अटक चोराचे नाव आहे. तो कल्याण पश्चिमेतील शंकरराव चौकातील गुजराती शाळेमागील कामगार वसाहत भागात राहतो. परेशने डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन आणि उल्हासनगरमधील मध्यवर्ति पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा तीन चोरीच्या घटनांची कबुली पोलिसांना दिली आहे.

मागील पंधरा दिवसांपासून ठाकुर्ली ९० फुटी रस्ता, चोळे, एमआयडीसी भागात सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना हेरून त्यांच्या गळ्यात सोन्याचा ऐवज असेल तर त्यांंच्यावर पाळत ठेऊन दुचाकीवरून येणारे दोन जण या महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरून नेत होते. या वाढत्या घटनांमुळे सकाळच्या बाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. या लुटमारीच्यावेळी महिला जखमी होत होत्या.

या चोरीच्या वाढत्या घटनांची रामनगर पोलीस ठाण्यात महिलांकडून तक्रार केली जात होती. गेल्या महिन्यात ९० फुटी रस्ता म्हसोबा चौक परिसरातील दावत हाॅटेल समोरील भागातून सकाळी साडे सात वाजता एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लुटला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात चोळेगाव ठाकुर्ली भागात मंजु शहा (६३) यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून पळ काढला होता.

ठाकुर्ली चोळे, ९० फुटी रस्ता भागात पहाटे पाच वाजल्यापासून ते चोरीची घटना घडेपर्यंत दोन चोरटे या भागात दुचाकीवरून फिरत होते. सकाळच्या वेळेत डोंबिवली, ठाकुर्ली चोळे भागातील नागरिक अधिक संख्येने या भागात फिरण्यासाठी येतात. या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांना विशेष पोलीस पथक तयार करून सोनसाखळी चोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. रामनगर पोलिसांच्या विशेष पथकाने गेल्या महिनाभरातील चोळे, ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता भागातील १७२ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रणाच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली. चोरटा परेश घावरी याला कल्याणमधून अटक केली. त्याच्याकडून एक लाख ८० हजाराची २० ग्रॅम सोन्याची साखळी, ९० हजार रूपये किमती १० ग्रॅमची सोन्याची साखळी, चोरीसाठी वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण पाच लाख ५५ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण, गोरखनाथ गाडेकर, हवालदार नीलेश पाटील, सुनील भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितीन सांगळे, देविदास पोटे, राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.