ठाणे : दिवा वसई रेल्वे मार्गावरील कामण भागात शुक्रवारी रेल्वेगाडीच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, बिबट्याचे पायही तुटले होते. त्याचे शव जाळून नष्ट  करण्यात आल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

दिवा वसई येथील कामण भागात शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बिबट्याला रेल्वेगाडीने धडक दिली होती. या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह असलेल्या ठिकाणी पंचनामा केला. त्यावेळी बिबट्याचा अपघात झाल्याने त्याचे पाय तुटल्याचे आढळून आले. तसेच मोठ्याप्रमाणात रक्तस्त्रावही झाल्याचे समोर आले.

हेही वाचा >>> टीएमटीच्या वातानुकूलित बसचे तिकीट दर निम्मे, प्रादेशिक परिवहन विभागाने दिली मंजुरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. शवाचे विच्छेदन केले असता, त्याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. हा नर बिबट्या असून त्याचे वय सुमारे तीन ते चार वर्ष आहे. हा बिबट्या सी-४५ असल्याची ओळख पटली आहे. तसेच २० जानेवारी २०२२ मध्ये बिबट्याचे छायाचित्र विहार चौकी येथील बसविलेल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आले होते. बिबट्याचा मृतदेह जाळून नष्ट करण्यात आला आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.