ठाणे : मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव येथील खाडी पुलाच्या दुभाजकाचा काही भाग कोसळून खाली पडला. भगदाड पडलेल्या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मार्गरोधक लावण्यात आले आहेत. तर, पुलावरील रस्ते मात्र सुस्थितीत असून या पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. तसेच या दुभाजकाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून नाशिक, गुजरात आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ही वाहने मुंब्रा बाह्यवळण मार्गे मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव येथून नाशिक तसेच भिवंडी मार्गे वाहतूक करतात. काही वाहने भिवंडी मार्गे गुजरातच्या दिशेने जातात. याशिवाय, इतर खासगी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या मार्गावर एखादे वाहन बंद पडले किंवा अपघात झाला तर, या मार्गावर कोंडी होते आणि त्याचा परिणाम मुंबई महानगरातील इतर रस्त्यांवरही होतो. त्यामुळे हा मार्ग महत्वाचा मानला जातो. तसेच या मार्गाला समृद्धी मार्ग जोडण्यात येणार असून त्यासाठी हा रस्ता रुंद करण्याचे काम सुरू आहे. खारेगाव खाडी पुल हा ३० ते ३५ वर्षे जुना झाला असून त्याशेजारी नवी पुलांची उभारणी करण्यात येत आहे. हे काम झाल्यानंतर जुना पुलाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. असे असतानाच, शनिवारी रात्री खाडी पुलाच्या दुभाजकाचा काही भाग कोसळून खाली पडला. याठिकाणी नवीन खाडी पुलाचे काम करीत असलेल्या कामगारांनी हा प्रकार पाहून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी धाव घेऊन भगदाड पडलेल्या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मार्गरोधक लावले, अशी माहीती सुत्रांनी दिली.

हे ही वाचा… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.., काँग्रेस सरकारने देशातील जनतेला वंचित ठेवले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक सुरळीतपणे सुरू

रस्त्यांवर दोन्ही बाजूची वाहने एकमेकांना धडकून अपघात होऊ नये यासाठी दुभाजक बसविण्यात आलेले असतात. तशाच प्रकारे खाडी पुलांच्या मधोमध काही अंतर सोडण्यात येतो. हा मोकळा भाग स्लॅब टाकून बंदीस्त करण्यात आलेला असतो. अशाचप्रकारे खारेगाव खाडी पुलावरील दुभाजक आहे. त्याचा काही भाग पडून तिथे मोठे भगदाड पडले आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी मार्ग रोधक बसविण्यात आलेले आहेत. पुलावरील रस्ते सुस्थितीत असल्याने येथून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.