ठाणे : शहरात अवकाळी पावसाने मंगळवार रात्रीपासून हजेरी लावली. वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शहरातील विविध भागांत एकूण १९ झाडे उन्मळून पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या पावसामुळे काही भागांत वाहतूक विस्कळीत झाली, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे एका ठिकाणी झाड वाहनांवर पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पडलेल्या झाडे अग्निशन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी कापून बाजूला केले.
ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत असून यात जिवितहानी तसेच वित्तहानीचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटणीची कामे नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच सुरू केली आहेत. मात्र, मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात १९ झाडे उन्मळूून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे घोडबंदर, बाळकुम अशा विविध भागात काही वेळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता.
त्याचप्रमाणे मंंगळवारी, ६ मे रोजी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास पाचपाखाडी भागातील पाटील वाडी परिसरात मिताली सोसायटीमध्ये झाड उन्मळूून पडल्याची घटना घडली. या परिसरातील रस्त्यावर उभ्या केलेल्या चार दुचाकी वाहनांवर झाड पडल्याने या चार वाहनांचे नुकसाना झाले आहे. तर, पाचपाखाडी भागातील तुळजाभवानी मंदिर परिसरात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास झाड पडल्याने या ठिकाणी काही वेळासाठी वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. त्याचबरोबर, खारकर आळी, वागळे इस्टेट, ढोकाळी, जवाहरबाग या भागात देखील झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनांची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेत, पडलेली झाडे कापून एका बाजूला केली असल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांनी दिली.