शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाणी असलेल्या तीन हात नाका चौकात यापूर्वीच उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली असली तरी, या चौकात शहरातील तीन मुख्य अंतर्गत रस्ते आणि चार सेवा रस्ते एकत्र येत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यावर उपाय म्हणून चौकातील मुख्य उड्डाण पुलाच्या पाथ्याजवळील परिसरात दोन्ही बाजूस यू आकाराचे उड्डाण पुल उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला असून या पुलाच्या कामासाठी अपेक्षित असलेल्या २८९ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास प्राधिकरणाच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या पुलांच्या उभारणीमुळे वाहनचालकांना सिग्नलमुक्त तसेच विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार असल्याने तीन हात नाका चौक वाहतूक कोंडीमुक्त होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा- कल्याणमधील दुर्गाडी खाडी किनारी वाळू माफियांची सामग्री महसूल अधिकाऱ्यांकडून नष्ट

ठाणे शहरातून पुर्व द्रुतगर्त महामार्ग जातो. या मार्गावरील तीन हात नाका चौक हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. या चौकातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी याठिकाणी यापुर्वीच उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मुंबई आणि नाशिकच्या दिशेने जाणारी वाहने या पुलावरून वाहतूक करतात. तर, या पुलाखालील चौकातील वाहतूक सिग्नल यंत्रणेद्वारे नियंत्रित केली जाते. परंतु या चौकात शहरातील तीन मुख्य अंतर्गत रस्ते आणि चार सेवा रस्ते एकत्र येत असल्यामुळे वाहनचालकांना चौकात तीन मिनीटे थांबून रहावे लागते. यामुळे सर्वच मार्गांवर वाहनांच्या लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होते. तसेच या परिसरात वडाळा घाटकोपर ठाणे मेट्रो मार्गाचे स्थानक उभारण्यात येणार असून यामुळे या ठिकाणी वाहने तसेच पादचारी वर्दळ यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता उपाययोजना करण्यासाठी मे. आकार अभिनव कंसल्टंट प्रा.लि. या सल्लागार संस्थेची नेमणूक केली होती. या संस्थेने परिसरातील वाहनांची संख्या, परिसरातील सेवा वाहिन्या, मेट्रो व अन्य प्रस्तावित प्रकल्प, वृक्ष, असे सर्वांचे सविस्तर सर्वेक्षण करुन प्रकल्पाकरीता विविध पर्याय सुचविले होते.

हेही वाचा- ठाणे महापालिकेच्या कोरस प्रसूतीगृहात पहिल्यांदाच यशस्वी प्रसूती शस्त्रक्रिया

यामध्ये अस्तित्वातील उड्डाणपुलावरुन लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर नवीन उड्डाणपुल बांधणे, लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर वाहनांकरीता भुयारी मार्ग बांधणे आणि महामार्गावर अस्तित्वातील उड्डाणपुलांच्या पायथ्याजवळील परिसरात दोन्ही दिशेला यू आकाराचे दोन स्वतंत्र उड्डाणपुल बांधणे या पर्यायांचा समावेश होता. परंतु महामार्गाखालून जात असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या जलवाहिन्या, प्रस्तावित मेट्रो मार्गिका व स्थानक तसेच अंतर्गत रस्तयांची अपुरी रुंदी यामुळे उड्डाणपुल आणि भुयारी मार्गाची उभारणी करणे शक्य नसल्याची बाब समोर आली होती. तर, महामार्गावर अस्तित्वातील उड्डाणपुलांच्या पायथ्याजवळील परिसरात दोन्ही दिशेला यू आकाराचे दोन स्वतंत्र उड्डाणपुल बांधण्याच्या पर्यायात कोणतीही अडचण येत नसून या पर्यायामुळे सर्व दिशेकडील वाहतूक विना अडथळा होणार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या पर्यायावर प्राधिकरणाने शिक्कामोर्तब करत त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी बैठकीच्या पटलावर ठेवला होता. त्यास प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने महामार्गावर दोन यू आकाराचे उड्डाण पुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

असे असतील दोन पूल

नाशिक दिशेकडील उड्डाणपूल पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन हात नाका चौकापासून काही अंतरावर सुरुवात होऊन महामार्गास समांतर दिशेने पुढे जाऊन अस्तित्वातील उड्डाणपुलाच्या समाप्तीनंतर वळण घेऊन पलिकडच्या बाजूने पुन्हा महामार्गास समांतर जाऊन मुंबई दिशेकडे चौकाच्या अलिकडे काही अंतरावर उतरेल. अशाच प्रकारे मुंबई दिशेकडील उड्डाणपुल तीन हात नाका चौकापासून काही अंतरावर सुरुवात होऊन महामार्गास समांतर दिशेने पुढे जाऊन अस्तित्वातील उड्डाणपुलाच्या समाप्ती नंतर वळण घेऊन पलिकडच्या बाजुने पुन्हा महामार्गास समांतर जाऊन नाशिक दिशेकडे चौकाच्या अलिकडे काही अंतरावर उतरेल. नाशिक दिशेकडील उड्डाणपुलाची एकूण लांबी ७०० मी. तर मुंबई दिशेकडील उड्डाणपुलाची लांबी ९१९ मी. असेल. दोन्ही उड्डाणपुल प्रत्येकी ३ मार्गिकांकरीता प्रस्तावित करण्यात आले आहेत. तीन हात नाका उड्डाणपुलांच्या काही भागामुळे सध्या त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या महामार्ग व सेवा रस्ते यामधील उद्यानांचा काही भाग बाधित होणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर बाधित उद्यानांच्या भागांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा- मिनाताई ठाकरे चौक उड्डाणपूलावर ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी

पूल झाल्यास कोंडी सुटेल

महामार्गावर अस्तित्वातील उड्डाणपुलांच्या पायथ्याजवळील परिसरात दोन्ही दिशेला यु आकाराचे दोन स्वतंत्र उड्डाणपुल उभारण्यात येणार आहेत. यामुळे तीन हात नाका परिसरात कोणत्याही दिशेकडे जाणाऱ्या वाहनांना चौक ओलांडण्याची गरज राहणार नाही. सर्व वाहने चौकाच्या ठिकाणी आल्यानंतर डावीकडे वळण घेऊन नविन उड्डाणपुलावरून महामार्ग ओलांडुन पलिकडच्या दिशेने इच्छित मार्गाने जाऊ शकतील. या रचनेमुळे सर्वच दिशेच्या वाहनांना महामार्ग न ओलांडता मार्गक्रमण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कोणतेही वाहन रस्ता ओलांडणार नसल्याने चौकात होणारी वाहतुक कोंडी पुर्णतः संपुष्टात येईल आणि हा चौक सिग्नल मुक्त होईल, असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे व मुलुंड स्थानकांदरम्यान नविन रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे. ठाणे शहरातून येणाच्या व प्रस्तावित रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांकरीता तीन हात नाका प्रकल्पाच्या मुंबई दिशेकडील उड्डाणपुलावरुन परस्पर उन्नत मार्गिका जोडण्याची सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. प्रस्तावित स्थानकाचे बांधकाम अद्याप सुरु झालेले नसल्याने सध्या या उन्नत जोडमार्गाचे सविस्तर डिझाईन विविध पर्यायाची पडताळणी करून ठरविण्यात येईल व त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही प्राधिकरणाने प्रस्तावात म्हटले आहे.

हेही वाचा- श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ११ हजार कोटींची विकासकामे ; ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत निधीची तरतूद

प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामात बाधित होणाऱ्या वृक्षांचे अन्यन्त्र पुर्नरोपण करणे, बाधित होणाऱ्या जल व मलनिःसारण वाहिन्यांचे स्थलांतरण करणे, अशी कामे करावी लागणार आहेत. प्रस्तावित उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे महामार्ग व सेवा रस्त्यांच्या काही मार्गिका व्यापल्या जाणार असून त्याचबरोबर उड्डाणपुलाशेजारील कमीत कमी ४ मार्गिकांची उपलब्धता आवश्यक आहे. त्यामुळे या परिसरातील सेवा रस्त्यांची वाहतुक ऐकेरी दिशेने करावी लागणार आहे. परंतु याबाबतचा निर्णय प्रकल्पाचे काम पुर्ण झाल्यानंतर तेथील वाहतुक वर्दळीचा अभ्यास करुन वाहतुक पोलिसांशी सल्लामसलत करुन घेण्यात येईल, असे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.