निष्काळजीपणाने दुचाकी चालविणाऱ्या एका दुचाकी स्वारामुळे आधारवाडी भागातील त्रिवेणी सोसायटीत राहणाऱ्या महिला डाॅक्टर गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर दुचाकी स्वार घटनास्थळावरुन पळून गेला.दंतचिकित्सक डाॅ. शर्वरी देशपांडे (३१) शुक्रवारी रात्री मुरबाड रस्त्यावरुन स्टार सिटी स्कॅन केंद्रासमोरुन जात होत्या. यावेळी त्यांच्या समोरुन भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत एक दुचाकी स्वार वेगाने आला. तो बाजुने जाईल असे वाटत असतानाच त्याने डाॅ. शर्वरी देशपांडे यांना जोराची ठोकर दिली. ठोकरीमुळे त्या काही फूट पुढे जाऊन पडल्या. त्यांच्या चेहऱ्याला, हात, पायाला गंभीर दुखापती झाल्या. या घटनेनंतर दुचाकी स्वार डाॅ. शर्वरी यांना मदत करण्याऐवजी तेथून पळून गेला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात डाॅ. शर्वरी यांनी तक्रार केली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपीचा शोध घेत आहेत.
हेही वाचा >>>ठाण्यात वर्षभरात ८५७१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत; यंदा पाणी देयंकाच्या वसुलीत १४ कोटी रुपयांनी वाढ
लॅपटाॅपची चोरी
दावडी गावातील रिजन्सी इस्टेटमध्ये राहणाऱ्या डाॅ. ओमप्रकाश वर्मा (४०) यांचा ७५ हजार रुपये किमतीचा लॅपटाॅप त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या जितू लोहार (३७) याने चोरुन नेल्याचा अंदाज व्यक्त करत डाॅ. वर्मा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. जितू हा पश्चिम बंगाल मधील बिरपारा अलीपूरव्दारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.