डोंबिवली – जिल्ह्यातील शाळांमध्ये आपली ओळख आहे. तिथे आम्ही पत्नीला शिक्षिका म्हणून नोकरीला लावतो. असे सांगून चार वर्षाच्या कालावधीत शिक्षिकेच्या पतीकडून मुंबई, पनवेल मधील पाच जणांनी सात लाख ५० हजार रुपये उकळले. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षकेच्या कुटुंबीयांनीटिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी मुंबई, पनवेल परिसरातील पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.डोंबिवलीतील मानपाडा रोड भागात रहात असलेले फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे पती श्रीराम मनचेकर यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी मुंबईतील सांताक्रुज वाकोला भागात राहणारे सुधाकर फातर्पेकर, दिशा फातर्पेकर, साई आणि कल्पेश फातर्पेकर, विलास मिश्रा यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या सन २०२३ च्या ३१८ (४) ३१ (८) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सन २०२१ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

तक्रारदार श्रीराम मणचेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, गुन्हा दाखल व्यक्तींनी संगणमत करून आपला विश्वास संपादन करून पत्नीला पालघर जिल्ह्यातील शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षिका म्हणून नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सुधाकर फातर्पेकर यांच्यासह इतर चार जणांनी पत्नी सृष्टी मनचेकर यांना पालघर जिल्ह्यातील बोईसर तालुक्यातील सेवाश्रम विद्यालय शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षिका म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. तसेच विक्रमगड तालुक्यातील कुर्जे येथील शाळेमध्ये, त्यानंतर कोडगाव येथील शांतीरत्न विद्यालयात कायमस्वरूपी शिक्षिकेची नोकरी देण्याचे आश्वासन दिले.

सुधाकर फातर्पेकर यांच्यासह इतर चार जणांनी शिक्षिका सृष्टी मणचेकर यांना या तिन्ही शाळांमध्ये नेऊन आपण तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षिकेची नोकरी देणार आहोत असे आमिष दाखवले. आणि या नोकरीच्या बदल्यात शिक्षिकेच्या कुटुंबीयांकडून टप्प्याटप्प्याने एकूण सात लाख ५० हजार रुपये उकळले.

या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षिकेच्या कुटुंबियांनी या याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विसपुते या प्रकरणाचा तपास करत आहेत.