उद्योग करून उद्योजिका होऊ पाहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेला एका महिलेनेच तब्बल सात लाख ७५ हजार रूपयांना गंडा घातला आहे. उल्हासनगरातील कॅम्प चार भागात राहणारी ही महिला कागदापासून कप बनविणाऱ्या यंत्राच्या प्रतिक्षेत होती. त्यासाठी या महिलेने प्रधानमंत्री महिला रोजगार योजनेच्या माध्यमातून बँकेतून कर्जही काढले होते. मात्र यंत्र देणाऱ्या महिलेने यंत्र दिले नाही पण पैसेही परत दिले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कळताच या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> उल्हासनगरात इमारतीचा काही भाग शेजारील बैठ्या घरावर कोसळून वृद्धाचा मृत्यू

उल्हासनगरच्या कॅम्प चारमधील लालचक्की परिसरात राहणाऱ्या मिनाक्षी रमेश शर्मा यांना उद्योग करण्यासाठी कागदापासून कप तयार करणारी छोटेखानी कंपनी सुरू करायची होती. त्यासाठी मिनाक्षी यांना त्यासाठीचे यंत्र हवे होते. त्यांनी कांती राजपुत यांच्याकडे त्यासाठी विचारणा केली होती. राजपुत त्यांना यंत्र देणार होत्या. त्यासाठी मिनाक्षी शर्मा यांनी प्रधानमंत्री महिला रोजगार योजनेच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प चार येथील महाराष्ट्र बँकेतून ७ लाख ७५ हजार रूपयांचे कर्जही काढले होते. ही रक्कम त्यांनी कांती राजपुत यांना दिली. मात्र त्यांना यंत्र मिळाले नाही. यंत्र आणि पैसे दोन्हीही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कळल्याने मिनाक्षी शर्मा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या या तक्रारीवरून कांती राजपुत या महिलेविरूद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.