डोंबिवली: ‘एक रक्षा (राखी) सैनिकांसाठी’ या शीर्षकांतर्गत डोंबिवलीतील एक तरुण २७ हजाराहून अधिक रक्षा आणि ७५० किलो मिठाई घेऊन कारगिल येथे निघाला आहे. १५ ऑगस्ट रोजी या तरुणाने डोंबिवली ते कारगिल या अडीच हजार किलोमीटरच्या प्रवासाला डोंबिवलीतून सुरूवात केली.

रोहित आचरेकर असे या तरुणाचे नाव आहे. मागील १७ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवित आहेत. सीमेवर भारतीय जवान चोवीस तास पहारा देत असतात. त्यांच्या प्रती देशातील जनतेला असलेला आदरभाव आपल्या उपक्रमातून व्यक्त व्हावा, या उद्देशातून आचरेकर हा उपक्रम राबवितात. लोकसहभाग, अनेक सामाजिक संस्थांचा सहभाग ते या उपक्रमात घेतात.

हेही वाचा… डोंबिवलीतील दिव्यांगाला व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसे देण्यासाठी धमकी

सीमेवरील सैनिक हा रोहित यांच्या शालेय जीवनापासून आवडीचा विषय. शाळेत असताना ते नियमित सीमेवरील सैनिकांना टपाल पत्र पाठवून त्यांच्या प्रती असलेला आदरभाव व्यक्त करत होते. आपले पत्र त्यांच्यापर्यंत पोहचते की नाही, असा प्रश्न त्यांना नेहमी सतावत होता. त्यामुळे उमेदीत आल्यावर रोहित यांनी स्वताहून सीमेवरील सैनिकांच्या भेटीगाठीचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात त्यांना ससून गावडे, प्रेम देसाई सोबत देतात.

हेही वाचा… रस्त्यावर खडी पसरल्याने डोंबिवलीतील घरडा सर्कल येथे दुचाकी स्वारांची घसरगुंडी

रक्षा बंधनाच्या दिवशी सीमेवरील सैनिकांना देशातील जनतेच्या प्रेमातून रक्षा बांधता याव्यात म्हणून रोहित यांनी देशाच्या विविध भागातून २८ हजाराहून अधिक रक्षा जमा केल्या आहेत. डोंबिवलीतील रोट्रॅक्ट क्लबने रक्षा संकलनासाठी मोलाची मदत केली. या रक्षा आणि ७५० किलो मिठाई घेऊन ते १० दिवसात कारगिल येथे पोहचणार आहेत. कारगिलसह परिसरात तैनात असलेल्या जवानांसोबत रोहित आणि त्यांचे सहकारी रक्षा बंधनाचा कार्यक्रम करणार आहेत. ५० किलो मिठाई कारगिल आणि उर्वरित मिठाई इतर लष्करी तळांवरील जवानांना वाटप केली जाणार आहे, असे रोहित यांनी सांगितले.

हेही वाचा… डोंबिवलीत पलावा येथे निवृत्त जवानाच्या पत्नीचा विनयभंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली, सुरत, अहमदाबाद, जयपूर, उदयपूर, पाली, चंडीगड, हरियाणा, पंजाब, यमुनानगर, दिल्लीमार्गे कारगिल असा प्रवास दुचाकीवरुन केला जाणार आहे. तमीळनाडू येथील एक गट लेह येथे लष्करी जवानांसोबत रक्षा बंधन कार्यक्रम साजरा करणार आहेत. काही परदेशस्थ नागरिकांनी थेट जम्मू येथे रक्षा पाठविणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आम्ही कारगिल येथे रक्षाबंधन करणार आहोत ही खूप आनंदायी बाब आहे, असे आचरेकर यांनी सांगितले.