कल्याण: सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी ११ लाख रूपये भरण्यास सांगून एका तरूणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी येथील तीन जणांच्या विरूध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश मुन्नालाल नेवारे (२८) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो विठ्ठलवाडी येथील विनायक काॅलनी भागात राहतो. घनश्याम मोहन परब, स्नेहल घनश्याम परब आणि विशाल ढोकळे अशी आरोपींची नावे आहेत. मागील दोन वर्षाच्या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवून देतो. आमची वरिष्ठ पातळीवर ओळख आहे, असे सांगून आरोपींची प्रकाशचा विश्वास संपादन केला. सरकारी नोकरी मिळते म्हणून प्रकाश याने आरोपींच्या मागणीप्रमाणे त्यांना रोख, धनादेश आणि ऑनलाईन माध्यमातून दोन वर्षाच्या काळात टप्प्याने अकरा लाख रूपये दिले.

हेही वाचा… नगररचना अधिकाऱ्यांची ‘एसआयटी’कडून चौकशी; डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसे भरणा केल्यानंतर प्रकाश आरोपींकडे नोकरीचे नियुक्ती पत्र मागु लागला. त्यावेळी ते लवकरच मिळेल. संबंधित अधिकारी रजेवर आहेत. ते आले की तुझे काम होईल, अशी कारणे देऊन वेळकाढूपणा करू लागले. वर्ष होऊन गेले तरी आपणास नियुक्तीचे पत्र मिळत नाही. प्रकाशला आरोपी टाळू लागले. संपर्काला प्रतिसाद देणे त्यांनी थांबविले. प्रकाश त्यांचा शोध घेऊ लागला तर ते प्रत्यक्ष कोठे भेटत नव्हते. आपली आरोपींनी फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर प्रकाश नेवारे याने पोलीस ठाण्यात तक्रार केली.