बदलापूरः सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी आरक्षणाला  मान्यता दिल्यानंतर आता  नगरपालिकांमधील प्रभाग आरक्षणात ओबीसींचा  समावेश  करण्याची  तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अ वर्ग नगरपालिका असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर पालिकांमध्ये येत्या २८ जुलै रोजी ओबीसी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये पुन्हा धाकधुक वाढली आहे. अंबरनाथ नगरपालिकेत १४ तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेत १२ जागांसाठी सोडत काढली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महिनाभरापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार नगरपालिका,  महापालिकांमध्ये प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणाला अंतिम रूप देण्यात आले. मात्र यावेळी झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीत ओबीसी समाजाचा विचार केला नव्हता. गेल्याच आठवड्यात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर आता निवडणूक आयोगानेही प्रभाग आरक्षणात त्या त्या महापालिकांच्या आरक्षणाच्या टक्क्यानुसार आरक्षित  जागा निश्चीतीचे काम सुरू केले आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या दोन अ वर्ग नगरपालिका आहेत. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेत अनुक्रमे ५९ आणि ४९ सदस्य  आहेत. आरक्षणाच्या  प्रमाणानुसार अंबरनाथमध्ये अनुसूचित जातीसाठी ८ तर अनुसूचित जमातीसाठी २ जागा आरक्षित आहेत. तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेत अनुसूचित जातीसाठी ७ तर अनुसूचित जमातीसाठी २ जागा आरक्षित  आहेत. तर महिलांसाठी आरक्षित जागांसह या आरक्षणासाठी १३ जून रोजी सोडत काढण्यात आली होती. या आरक्षण सोडतीत अनेकांना धक्का बसला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता पुन्हा ओबीसी आरक्षणाचा समावेश करून आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यात अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणाचा समावेश नसेल. त्यामुळे हे आरक्षण सोडून दोन्ही नगरपालिकांमध्ये २८ जुलै रोजी आरक्षण  सोडत पार  पडणार आहे. नागरिकांचा  मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशी  ही सोडत  पार पडेल अशी माहिती दोन्ही  नगरपालिकांच्या वतीने देण्यातआली आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेला २७ टक्के ओबीसी आरक्षण मिळाले आहे. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगरपालिकेत १२ जागांसाठी सोडत पार पडेल अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे. तर  अंबरना नगरपालिकेला २४ टक्के आरक्षण मिळाले असून त्यानुसार १४ ओबीसी जागांसाठी आरक्षण सोडत पार पडेल.