लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : कोपरी येथे पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्त्यावरून येणाऱ्या एका बेस्ट बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. या अपघातात बसमधील पाच प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

बोरिवली रेल्वे स्थानक ते ठाणे पूर्व रेल्वे स्थानक या मार्गावर ही बस दररोज चालवली जाते. ही बस गुरुवारी रात्री ठाण्याकडे येत असताना, बस चालकाने पूर्व दृतगती महामार्गावरुन कोपरी येथे जाण्यासाठी सेवा रस्त्यावर वळण घेतले. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्ता दुभाजकाला धडकली. यावेळी या बसमधून ३० प्रवासी प्रवास करत होते.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, बेस्ट विभागाचे अधिकारी व कर्मचारी, संबंधित ई – बस कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या अपघातामुळे सेवा रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता. तर बेस्ट प्रशासन कर्मचारी, शहर वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या दुभाजकाला धडकलेली बस बाजूला करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातात ४ ते ५ प्रवासी जखमी

या अपघातात ४ ते ५ प्रवाशांना दुखापत झाली. अपघातानंतर काही प्रवासी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले. तर, राजेश मालुसरे (२७) यांना कपाळाला आणि पाठीला आणि सुवास वाघमारे(४८) यांच्या नाकाला दुखापत झाली. त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.