ठाणे : घोडबंदर मार्गावरील मानपाडा उड्डाणपूलाजवळ मंगळवारी सकाळी एका कार चालकाला फीट आल्याने अपघात झाला. या अपघातात चालकाच्या पत्नीला देखील दुखापत झाली आहे. त्यांना पोलिसांनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले. या अपघातानंतर परिसरात काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. त्याचा परिणाम अंतर्गत मार्गावरही झाला.
घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने कार चालक त्याच्या पत्नीसोबत वाहतुक करत होता. मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कार मानपाडा उड्डाणपूलाजवळ आली असताना अचानक कार चालकाला फीट आली. त्यामुळे कार येथील दुभाजकाला धडकली. या अपघातात कार चालकाच्या पत्नीला देखील दुखापत झाली. घटनेची माहिती वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.
या कालावधीत वाहनांचा भार वाढल्याने घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. विविध प्रकल्पांची कामे देखील सुरु असल्याने कोंडीत आणखी भर पडली. काही वाहन चालकांनी ब्रम्हांड, कोलशेत मार्गे वाहतुक करण्याचा प्रयत्न केला. परंतु येथील अरुंद रस्त्यांमुळे अंतर्गत मार्गावरही कोंडी झाली होती. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांसाठी वाहन चालकांना अर्धा तास लागला. अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी रस्त्याच्या बाजूला केले. त्यानंतर येथील वाहतुक सुरळीत झाली.
ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरही कासारवडवली भागात मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एक खासगी बसगाडी बंद पडली होती. त्यामुळे या मार्गावरही वाहतुक कोंडी झाली. कासारवडवली, आनंदनगर, परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे वाहन देखील पोलिसांना यंत्रणेच्या साहाय्याने बाजूला करावे लागले.