कल्याण – कल्याण शिळफाटा रस्त्यावर महिनाभरापासून खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. मागील पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून दुचाकी स्वार पडण्याच्या, वाहने आपटण्याच्या घटना वाढत आहेत. प्रवाशांमागे खड्ड्यांची डोकेदुखी असताना, कल्याण पूर्वेतील चक्कीनाका सूचकनाकाकडे जाणाऱ्या शिळफाटा या वर्दळीच्या रस्त्यावर भुयारी गटावरील एक झाकण तुटले आहे. त्यामुळे दुचाकी स्वार या गटाराच्या दारात अडकून पडत आहेत.
शिळफाटा रस्त्यावरील चक्कीनाका भागातील भुयारी गटारावरील हे झाकण सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे सुरूवातीला सैल झाले. या सैल झाकणावरून सतत वाहन जाऊन ते तुटण्याची शक्यता विचारात घेऊन कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी हे झाकण तुटून अपघात होऊ नये म्हणून ते झाकण भुयारी गटाराच्या झाकणाला आजुबाजुला ठोकुन घट्ट बसविण्याचा प्रयत्न केला. काही तासापुरते हे झाकण घट्ट झाले. परंतु, सतत वाहने या झाकणावरून धावत असल्याने ते अखेर तुटले आहे.
या तुटलेल्या झाकणावरून मागील दोन दिवसांपासून वाहने धावत आहेत. रात्रीच्या वेळेत दुचाकी स्वाराच्या, लहान मोटारीच्या चालकाच्या हे तुटलेले झाकण निदर्शनास आले नाहीतर या दोन्ही वाहन चालकांच्या वाहनांची चाके भुयारी गटारात अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. दुचाकी स्वार तर दररोज या झाकणावर आपटून पडत आहेत. रात्रीच्या वेळेत हे प्रमाण अधिक आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना पाणी तुंबून हे मोकळे असलेले भुयारी गटार पादचाऱ्याच्या निदर्शनास आले नाहीतर तो या भुयारी गटारात पडून त्याच्या पायाला गंभीर इजा होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
चक्कीनाका सूचकनाका हा शिळफाटा रस्त्यालगतचा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. पुणे, उल्हासनगर, कल्याण पूर्व भागात जाण्यासाठी प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. त्या रस्त्यावर गटारावरील झाकण तुटले आहे. या तुटलेल्या झाकण भागातून काही वाहन चालक संथगतीने वाहने चालवितात. त्यामुळे या भागात कोंडी होते. आणि याठिकाणी अपघात टाळण्यासाठी कायमस्वरुपी एक वाहतूक पोलीस तैनात ठेवावा लागत आहे.
मागील २५ दिवसांपूर्वी कोळसेवाडी वाहतूक विभागाने कल्याण डोंबिवली पालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, एमआयडीसी कार्यालयांना पत्र पाठवून आपल्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे पाऊस सुरू होण्यापूर्वी सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे. तसेच, रस्त्यांलगतच्या गटार, नालेसफाईची कामे पूर्ण करून घेण्याची सूचना केली आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही एकही स्थानिक स्वराज्य संस्था वाहतूक विभागाच्या पत्रांची दखल घेत नसल्याचे समजते. अधिक माहितीसाठी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
चक्कीनाका येथे शिळफाटा येथे गटारावरील झाकण तुटल्याने दररोज चार ते पाच दुचाकी स्वार याठिकाणी अडकून पडतात. आम्ही व्यापारी त्यांना मदत करतो. वाहतूक पोलीस त्यांंना रुग्णालयात जाण्यासाठी साहाय्य करतात. मोठा अपघात झाल्यावर एमएसआरडीसी याठिकाणचे खड्डे, तुटलेली झाकणे बसविणार का.कृष्णा करंंडे व्यावसायिक.