आरोपीच्या अटकेसाठी भारत-नेपाळ सीमेवर पोलिसांनी रचला होता २६ तास सापळा
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका हाॅटेलमध्ये एका ६५ वर्षीय व्यक्तीची टोकदार वस्तूच्या साहाय्याने क्रुररित्या हत्या करून नेपाळमध्ये नेपाळमध्ये पळून गेलेल्या राजन शर्मा (२०) याला ठाणेनगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली. त्याच्या अटकेसाठी भारत-नेपाळ सीमेवर २६ तास पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. राजन याने केवळ पैशांच्या हव्यासापोटी वृद्धाची हत्या केली. विशेष म्हणजे, त्या वृद्धाने राजनकडे पैसे काढण्यासाठी विश्वासाने डेबिट कार्ड आणि त्याचे परवलीचे अंक (पासकोड) दिले होते. परंतु बँकेतील जमा रक्कम पाहिल्यानंतर राजनने वृद्धाच्या हत्येचा कट रचला होता.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रिन्स हाॅटेल आहे. या हाॅटेलमध्ये गुजरात येथील राजकोट भागात राहणारे काराभाई सुवा हे काही कामानिमित्ताने आले होते. २७ मे या दिवशी या हाॅटेलमधील खोली क्रमांक ३०३ मध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत काराभाई सुवा यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हाॅटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी सुमारे २० दिवसांपासून कामावर रूजू झालेला राजन शर्मा हा देखील गायब असल्याचे आढळून आले. त्यानुसार, राजन विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा >>>ठाण्यात वीजेचा धक्का लागून भटक्या श्वानाचा मृत्यु? खांबातून वीजेचा प्रवाह होत नसल्याचा ठाणे महापालिकेचा दावा
याप्रकरणी अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त गणेश गावडे, साहाय्यक आयुक्त विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी एक पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, राजन हा रत्नागिरीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. हत्येनंतर राजनने वृद्धाचे डेबिट कार्ड चोरले होते. त्या डेबिड कार्डमधून त्याने ८० हजार रुपये काढले. पोलिसांचे पथक रत्नागिरी येथे गेले असता, राजन याने तिथून पळ काढला होता. त्यानंतर तो कर्नाटक येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक पथक कर्नाटक येथे पोहचले. परंतु तो तिथूनही निघून गेला होता.
हेही वाचा >>>ठाणे: जाहीरात फलक पडून जिवीतहानी झाल्यास मालकावर गुन्हा दाखल होणार
दरम्यान, राजन हा रेल्वेने प्रवास करून त्याच्या मूळगावी उत्तरप्रदेश येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कर्नाटक येथून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या नागपूर रेल्वे स्थानकातून उत्तरप्रदेशमध्ये जातात. त्यामुळे पोलीस नागपूर रेल्वे स्थानक येथे गेले. परंतु तिथेही तो आढळून आला नाही. राजन हा ३१ मे या दिवशी गोरखपूर येथे गेल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर पोलीस पथक उत्तरप्रदेश येथे गेले. तिथेही त्याचा शोध घेत असताना तो छुप्या पद्धतीने नेपाळ या देशात निघून गेला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळविली असता, तो ५ किंवा ६ जूनला पुन्हा उत्तरप्रदेश येथे पुन्हा येणार असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवर सापळा रचला. २६ तासाच्या सापळ्यानंतर राजनला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पैशांसाठी त्याने ही हत्या केल्याची कबूली पोलिसांना दिली.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील पोलीस अधिकारी शेखर बागडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल
राजन हा विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. तो ठाण्यातील प्रिन्स हाॅटेलमध्ये कामाला लागला होता. तर काराभाई हे ठाण्यात आल्यानंतर अनेकदा प्रिन्स हाॅटेलमध्ये थांबत असत. काराभाई यांना खर्चासाठी बँकेमधून पैसे काढायचे होते. वृद्ध असल्याने त्यांनी त्यांचे डेबिट कार्ड आणि त्याचे परवलीचे अंक राजनला दिले होते. एका एटीएम केंद्रात राजन पैसे काढत असताना त्याने त्यांचे बँक खाते तपासले. त्यावेळी काराभाई यांच्या खात्यातील मोठी रक्कम जमा पैसे पाहून राजनने त्यांच्या हत्येचा कट रचला. पैसे घेऊन आल्यानंतर राजनने त्याच्याकडील टोकदार वस्तूने काराभाई यांना मारून त्यांची क्रूरतेने हत्या केली. त्यानंतर तो अतिशय थंड डोक्याने तो त्या खोलीतून बाहेर पडला. हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांना त्याने गावाला चाललो असल्याचे सांगून पळ काढला.