डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील पलावा सिटीतील कासा रिओ ॲन्ड कासा गोल्ड सहकारी सोसायटी फेडरेशनचा कारभार पाहत असताना या फेडरेशनच्या जबाबदारी निश्चित केलेल्या पाच व्यवस्थापन समिती सदस्यांनी ७७ लाख ७९ हजार १२८ रूपयांची अनियमितता केली आहे. या सदस्यांमुळे फेडरेशनचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची जबाबदारी पाच सदस्यांवर निश्चित करून चौकशी अधिकाऱ्यांनी ही रक्कम १२ टक्के व्याज दराने वसुल होईपर्यंतच्या तारखेपर्यंत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ च्या नियमातील तरतुदीनुसार वसूल करण्यात यावी, असे आदेश फेडरेशनचे प्राधिकृत चौकशी अधिकारी आणि ठाणे सहकारी संस्था (ग्राहक) विभागाचे विशेष लेखा परीक्षक उत्तम अहिरे यांनी दिले आहेत.

अकरा महिने फेडरेशनच्या लेखा परीक्षण अहवालाची चौकशी सुरू होती. समीर कोंढाळकर आणि इतर सदस्यांंवर सहकारी संस्था विशेष परीक्षक अहिरे यांनी जबाबदारी निश्चित केली आहे. या आदेशाची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.

चार वर्षापूर्वी पलावा सिटीतील कासा रिओ ॲन्ड कासा गोल्ड सहकारी सोसायटी फेडरेशनचा कारभार पाच व्यवस्थान समिती आणि इतर सदस्य पाहत होते. या गृहप्रकल्पात उपहार गृह. क्रिकेट प्रशिक्षण वर्ग, बस सेवा, फलोत्पादन, बागकाम सेवा असे अंतर्गत सुविधा प्रकल्प आहेत. या सुविधा प्रकल्पांसह बँँक दर आकारणी, टीडीएस रक्कम वसुली संदर्भात लेखा परीक्षणात अनियमितता झाल्याच्या इतर सदस्यांचा आरोप होता. याप्रकरणी तक्रारदार सदस्यांनी सहकारी संस्था विभागाकडे तक्रारी करून याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षक नेमण्याची मागणी केली होती.

सहकारी संस्था विभागाचे लेखा परीक्षक उत्तम अहिरे या फेडरेशनवर चौकशी अधिकारी म्हणून काम पाहत होते. फेडरेशनच्या सदस्यांची चौकशी, लेखा परीक्षण कागदपत्रांची तपासणी, उपलब्ध पुराव्यातून फेडरेशनच्या व्यवस्थापक समिती सदस्यांनी ७७ लाख ७९ हजार १२८ रूपयांचे आर्थिक नुकसान केले असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ७२(अ) प्रमाणे चौकशी अधिकाऱ्यांनी व्यवस्थापक समिती सदस्यांवर आरोप निश्चित करून नुकसानीची रक्कम वसुलीचे निर्देश दिले. फेडरेशनचे जबाबदारी निश्चित केलेले व्यवस्थापक समिती सदस्य आणि इतरांकडून उपहारगृह उत्पन्न, ६ लाख ३१ हजार रू., क्रिकेट प्रशिक्षण एक लाख ७३ हजार, बस सेवा ६० लाख ९३ हजार, फलोत्पादन बागकामचे आठ लाख सहा हजार, बँँक दर आकारणी ४९ हजार आणि चौकशी शुल्क २५ हजार रूपये वसूल करण्यात यावे, असे निर्देश चौकशी अधिकाऱ्यांंनी दिले आहेत. कासा रिओ, गोल्ड प्रकल्पात ३९ इमारती, १० हजार ७०० सदनिका आहेत. नुकसानीची रक्कम फेडरेशनच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. पारदर्शकता, वित्तीय शिस्तीसाठी हा निर्णय खूप महत्वाचा मानला जात आहे.