कल्याण: गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकात, लोकलमधून प्रवास करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३११ प्रवाशांवर रेल्वे संरक्षण दलाने बुधवारी संध्याकाळी एका विशेष मोहिमेतंर्गत कारवाई केली. ठाणे, कल्याण, डोंंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, दिवा, मुंब्रा, टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
दूरदृश्यप्रणालीव्दारे रात्र न्यायालयाच्या आदेशावरून या प्रवाशांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाच्या आदेशावरून दंड आकारण्यात आला. ४७ हजार रूपयांचा दंड या कारवाईत वसूल करण्यात आला.
हेही वाचा… ठाणे: निधीअभावी पादचारी पूल उभारणीची कामे रखडल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, रेल्वे संरक्षण दल यांच्या एकत्रित प्रयत्नातून एका वेळी ठाणे, कल्याण, डोंंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, दिवा, मुंब्रा, टिटवाळा या रेल्वे स्थानकांवर ही कारवाई करण्यात आली. आरक्षित डब्यात प्रवेश करणाऱे १९७ प्रवासी, विना तिकीट रेल्वे स्थानकात घुसखोरी १३ प्रवासी, रेल्वे सेवकांच्या सुचनांचे उल्लंघन, मद्यपान करून धिंगाणा घालणे, अपंगांच्या डब्यातून प्रवास करणे अशा एकूण ३११ प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली.