ठाणे : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांबरोबरच पक्ष्यांसाठी घातक ठरत असल्यामुळे अशा मांजांच्या वापरावर ठाणे महापालिकेने प्रतिबंध केला आहे. पालिकेच्या पथकाकडून दुकानांमध्ये तपासणी मोहिम राबवून मांजा जप्तीची कारवाई केली जाणार असून अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. यामुळे चिनी मांजा, चिनी दोरा वापरणे महागात पडण्याची चिन्हे आहेत.

पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारिक चूरा केलेली काच, धातू किंवा अन्य तिक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नाही. पतंग उडवण्यासाठी केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. त्यामुळे चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजांच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे.

हेही वाचा – ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री

चिनी मांजा आणि सिंथेटिक-नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी पालिकेच्या पथकाकडून दुकानांमध्ये तपासणी मोहिम राबवून मांजा जप्तीची कारवाई केली जाणार आहे. प्रभाग समिती स्तरावर ही तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरिक्षक, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, प्रतिबंधित सिंथेटिक, नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा किंवा वापर याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांबरोबरच पक्ष्यांसाठी घातक ठरत असल्यामु‌ळे त्याच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील दुकानांमध्ये तपासणी मोहिम राबवून मांजा जप्तीची कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनीही अशीच कारवाई करावी यासाठी त्यांनाही पत्र पाठविले आहे. याशिवाय, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. – प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका