कल्याण: धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश देऊनही काही विकासक त्याची गंभीर दखल घेत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने आता सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणाऱ्या, निर्माणाधिन बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

कल्याण पूर्वेतील आय प्रभागात निर्माणधिन गृहप्रकल्पांच्या विकासकांना साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी नोटिसा देऊन धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. नोटिसा मिळाल्यानंतर विकासकांनी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक होते. काही निर्माणाधिन गृहप्रकल्पांच्या ठिकाणी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी पुन्हा भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना बांधकामासाठी लागणारे लोखंड, सिमेंट, राडारोडा रस्त्यावर, पदपथावर पडल्याचे दिसून आले. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या खडीवर पाणी मारले जात नव्हते. जेसीबीने खोदकाम करताना तेथे पाण्याचा मारा केला जात नव्हता.

हेही वाचा… कल्याण रेल्वे स्थानकात मेल-एक्सप्रेससाठी स्वतंत्र यार्ड; सहा नवीन फलाटांच्या उभारणीला प्रारंभ

नोटीस देऊन, सूचना करूनही गृहप्रकल्पासाठी लागणारे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून ठेवले म्हणून विकासाचे पर्यवेक्षक राजेश पावशे, दत्ता गवळी यांना प्रत्येकी पाच हजार रूपयांप्रमाणे १० हजार रूपयांचा दंड साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी ठोठावला. तातडीने संबंधित साहित्य रस्त्यावरून हटवून प्रकल्पाच्या आतील भागात घेण्याच्या आणि प्रकल्पाला चोहोबाजुने उंच पत्रे लावण्याच्या सूचना विकासकांना केल्या.

रस्त्यावर कचरा जाळणाऱ्या रहिवासी, दुकानदार, झोपडपट्टी भागातील नागरिक यांचाही शोध घेतला जात आहे. कचरा जाळताना प्रत्यक्ष घटनास्थळी सापडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी विशेष पाहणी पथके स्थापन केली आहेत. या कारवाईचा अहवाल दररोज वरिष्ठांना दिला जात आहे, असे मुंबरकर यांनी सांगितले.

ग प्रभागात कारवाई

डोंबिवली पूर्वेतील ग प्रभाग हद्दीत आयरे गाव भागात भवर लाल यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळून हवा प्रदूषण केले म्हणून त्यांना ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या आदेशावरून कारवाई पथकाने पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. अशाच प्रकारची कारवाई इतर प्रभागांमध्ये सुरू आहे. ह, फ प्रभागातील पाहणी पथकेही अशाच पध्दतीने प्रकल्पांच्या ठिकाणी भेटी देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आय प्रभाग हद्दीत नव्याने सुरू असलेल्या गृहप्रकल्पांची, पुनर्विकासातील इमारतींची पाहणी सुरू केली आहे. धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना न करणाऱ्या विकासकांना, कचरा जाळणाऱ्या व्यापारी, नागरिकांना दंड ठोठावण्याची कार्यवाही सुरू केली आहे.” – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.