ठाणे : कळवा येथील कारगिल खोंडा भागात वन विभागाने गुरुवारी ५७८ अतिक्रमणांवर कारवाई करत ४.७१० हेक्टर वन जमीन अतिक्रमण मुक्त केली. काही दिवसांपूर्वीच पथकाने ४७५ अतिक्रमणांवर कारवाई केली होती. वन विभागाच्या या कारवायांमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.कळवा येथील पारसिक डोंगर परिसरात कारगिल खोंडा परिसर आहे. मागील काही वर्षात या भागात मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले होते.
डोंगर उतारावरील अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात दरडी कोसळून अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी गेल्याकाही दिवसांपासून वन विभागाकडून कारवाई केली जात आहे. गुरुवारी ठाणे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक वन संरक्षक हिरीजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले, वनपाल सचिन सुर्वे, वनरक्षक अनिल भामरे तसेच ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागासह पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ५७८ बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसेच ४.७१० हेक्टर वन जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे.