शहरात अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचा निर्णय अंबरनाथ तालुका प्रशासनाने घेतला असून अंबरनाथचे तहसीलदार अमित सानप यांच्या नेतृत्वाखाली बदलापुरात अनधिकृरीत्या बांधण्यात आलेल्या १९ खोल्या गुरुवारी सायंकाळी पाडण्यात आल्या आहेत.
बदलापूर पश्चिम भागात शहर हद्दीत वडवली गाव असून येथे काही चाळमाफियांनी अनधिकृतरीत्या १७ खोल्या बांधल्या होत्या. या वडवली गावाला लागून असलेल्या ग्रामीण भागात मोडणाऱ्या साई या गावात २ अनधिकृत खोल्या बांधण्यात आल्या होत्या. या अनधिकृत खोल्यांच्या मालकांना जुलै महिन्यात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या व पुरावे सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, कोणतेही पुरावे सादर न केल्याने या महाराष्ट्र शासनाच्या गायरान जमिनीवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत खोल्या अखेर गुरुवारी सायंकाळी पाडण्यात आल्या आहेत. या वेळी अंबरनाथ तहसील कार्यालयाचे कर्मचारी, बदलापूर नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी विभागाचे पथक तसेच कुळगाव ग्रामीण व बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे असे ४० पोलीस कर्मचारी या वेळी उपस्थित होते. अशी माहिती अंबरनाथचे तहसीलदार अमित सानप यांनी दिली. दरम्यान, गेल्या चार महिन्यांतली तहसील कार्यालयामार्फत केलेली ही चौथी अतिक्रमणविरोधी कारवाई असून यामुळे चाळमाफियांचे धाबे दणाणले आहे.