आयुक्त प्रशासक असूनही ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांचाच वरचष्मा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने शनिवारपासून ठाणे महापालिकेतही प्रशासकीय राजवट अस्तित्वात आली असली तरी राज्याचे नगरविकास आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांचाच येथे एकछत्री अंमल राहील असे चित्र आहे. निवडणुका होईपर्यंत महापालिकेचा कारभार तांत्रिकदृष्टय़ा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या हाती रहाणार आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना तयार करून त्यावर हरकती मागविल्या होत्या. त्यावर नुकतीच सुनावणी घेऊन ती अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. असे असले तरी ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ५ मार्च रोजी संपुष्टात आली. या मुदतीत पालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांनी पालिकेची वाहने प्रशासनाकडे जमा केली आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांनी पालिकेची सुरक्षा व्यवस्थाही परत केली आहे. पालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनात सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांची तसेच विविध कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची रिघ असायची. परंतु सोमवारी पालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनात शुकशुकाट दिसून येत होता. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे प्रशासक म्हणून पालिकेचे कामकाज पाहणार आहेत.

शिंदे यांच्या अमलाखाली निर्णय, विरोधकांची टीका

ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली असली तरी नगरविकास खात्याचे मंत्रिपद असल्याने या महापालिकेवरही आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकछत्री अंमल लागू होणार आहे. ठाणे जिल्ह्यात यापूर्वी नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली असली तरी तेथील कारभारातही शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला जातो. कल्याण डोंबिवली महापालिकेत तर विद्यमान आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी हे पूर्णपणे शिंदे यांच्या अंमलाखाली निर्णय घेत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. नवी मुंबईतही अभिजीत बांगर याच्याकडे आयुक्तपद असले तरी कधी नव्हे ते शिंदे यांच्या माध्यमातून नवी मुंबईवर शिवसेनेचा वरचष्मा दिसू लागला आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली आहे. याठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याकडेही मंत्रिपद असले तरी नगरविकास आणि पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचाच शब्द येथे प्रमाण मानला जातो. डॉ.विपीन शर्मा यांच्याकडे आयुक्तपद असले तरी शिंदे यांचाच येथे वरचष्मा दिसून येईल हे स्पष्ट आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administrative despite commissioner commissioner eknath shinde thane municipal corporation ysh
First published on: 08-03-2022 at 02:54 IST