ठाणे : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागताच, या घटनेनंतर खडबडून जाग आलेले ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शाळांमध्ये सखी सावित्री समित्या आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी आज सकाळी साडे सहा वाजता बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात काही आंदोलकांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद केली. नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागताच, शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने संस्थाचालकांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. संतप्त जमावाने बदलापूर येथे रेल रोको आंदोलन छेडले आहे. तुरळक दगडफेकही झाली आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असे जाहीर करुन जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश दिले आहेत. घडलेल्या घटनेच्या मन:स्तापाबद्दल संस्थेने माफी मागितली आहे. कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेवू नये, जिल्हा प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही, हे तपासण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

हेही वाचा >>>बदलापूर-कर्जत रेल्वे वाहतूक ठप्पच, सहा तासानंतरही ठिय्या आंदोलन कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. या समित्या शाळांमध्ये आहे की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी बदलापूरच्या घटनेनंतर दिले आहेत. असे असले तरी शिक्षण विभागाकडे मात्र याबाबत ठोस माहिती उपलब्ध नव्हती. ठाणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्याकडे समितीबाबत विचारणा केली असता, यापुर्वी शाळांमध्ये अशा समित्या स्थापन करण्यात आल्याचा दावा केला. परंतु शाळांमधील समित्यांची संख्या आणि त्याबाबतची अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी टाळाटाळ केली. यावरूनच जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभार पुढे आला आहे.