डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील दीडशे ते दोनशे मीटर परिसरात एकही फेरीवाला बसणार नाही यादृष्टीने पालिकेच्या ग आणि फ प्रभागाने दररोज सकाळ, संध्याकाळ कारवाई सुरू केली आहे. या सततच्या कारवाईमुळे रेल्वे स्थानक भागातील रस्ते मोकळे राहत असल्याने पादचारी समाधान व्यक्त करत आहेत.

फेरीवाल्यांवर रस्ते, पदपथांवरून उठविण्याची कारवाई करण्यापेक्षा आता फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्याची आणि ते परत सोडून न देण्याचा निर्णय फेरीवाला हटाव पथक कारवाई पथकाने घेतला आहे. ग प्रभागात साहाय्यक आयुक्त संजय साबळे, फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, परिमंडळ उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या आदेशावरून ग प्रभाग हद्दीतील रामनगर रेल्वे स्थानक भाग, डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी, कामत मेडिकल पदपथ, दत्तनगर, संगीतावाडी, शिवमंदिर रस्ता भागात एकही फेरीवाला बसणार नाही यासाठी कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा – पुणे : महावितरणच्या विधी सल्लागारांना लाच घेताना पकडले, महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयात ‘एसीबी’ची कारवाई

उर्सेकरवाडी भागात कारवाई करत असताना काही फेरीवाले आक्रमक झाले होते. त्यांना भाजप पदाधिकारी बाळा पवार यांनी पुढाकार घेऊन पालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईत अडथळा न आणण्याची तंबी दिली. बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भिवंडी, मस्जीद, भायखळा परिसरातून डोंबिवलीत येऊन व्यवसाय करत आहेत.

सकाळ, संध्याकाळ वर्दळीच्या वेळेत नागरिकांना चालण्यासाठी रस्ते मोकळे पाहिजेत असे आयुक्तांचे आदेश आहेत. रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला रस्ते, पदपथ अडवून बसणार नाही यादृष्टीने आम्ही दररोज कारवाई करत आहोत. एखादा फेरीवाला आक्रमक झाला तर त्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करतो. सकाळी आठ ते दुपारी एक, संध्याकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, असे ग प्रभागाचे पथक प्रमुख साळुंखे यांनी सांगितले.

बाजार हटविला

मानपाडा रस्त्यावर अनेक दिवसांपासून पदपथ, रस्ते अडवून भरणारा फेरीवाल्यांचा सोमवारचा बाजार फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील, पथक प्रमुख मुरारी जोशी यांनी बंद पाडला आहे. सोमवारी मानपाडा रस्त्यावर दोन टेम्पो आणि कारवाई पथक सज्ज ठेवले होते. त्यामुळे एकही फेरीवाला बाजारात दाखल झाला नाही. यापुढे दर सोमवारी मानपाडा रस्त्यावर संध्याकाळी चार वाजल्यापासून फेरीवाला हटाव पथकाची गस्त ठेवण्यात येणार आहे. सोमवारचा पूर्व भागात भरणारा बाजार कायमस्वरुपी बंद होईल यादृष्टीने नियोजन केले आहे, असे साहाय्यक आयुक्त पाटील यांनी सांगितले. रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. स्मार्ट सिटी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जात आहे, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा – बीबीसी कार्यालयावरील छाप्याचे पुण्यात पडसाद; केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे मूक आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर, अंतर्गत गल्ल्यांमध्ये एकही फेरीवाला दिसणार नाही, अशा पद्धतीने फेरीवाला हटविण्याचे नियोजन केले आहे. फेरीवाला कारवाईविरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या फेरीवाल्यांचे सामान जप्त आणि फौजदारी कारवाई केली जात आहे.” असे डोंबिवली ग प्रभाग पथम प्रमुख राजेंद्र साळुंखे म्हणाले.

राजेंद्र साळुंखे
पथक प्रमुख
ग प्रभाग, डोंबिवली

फोटो ओळ