ठाणे : ठाणे जिल्ह्यात पारंपरिक शेतीला आधुनिक आणि पर्यावरणपूरक दिशा देण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने यंदा एकूण ११०० हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे व्यापक नियोजन केले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी जोरात सुरू असून, सद्यस्थितीत लागवडीसाठी सुमारे ८० हजार बांबू रोपांची उपलब्धता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३५० हेक्टरवर बांबू लागवड करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात विविध प्रयोग राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून भातपीक ओळखले जाते. भातपिकाबरोबरच इतर पिकांना देखील प्राधान्य देत कृषी विभागाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळ शेती आणि फुल शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केल्याने जिल्ह्यात आंबा, सीताफळ, चिकू यांसह मोगरा, सोनचाफ्याची शेती देखील मोठ्या प्रमाणात केली जाते आहे. याच पार्श्वभूमीवर आता बांबू उत्पादनासाठी जिल्हा कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने बांबू शेतीला चालना देण्यासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. बांबूला कृषी उत्पादनाचा दर्जा देण्यात आल्याने त्याच्या लागवडीसंदर्भातील अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. बांबू कृषी पिकात समाविष्ट झाल्याने त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना अधिक स्वातंत्र्य आणि सहज प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ स्थिर उत्पन्नाचे साधन मिळणार नाही, तर पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा प्रकल्प हरित व शाश्वत शेतीच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. ठाणे जिल्हा कृषी विभागाच्या पुढाकारामुळे आता शेतकऱ्यांना बांबू शेतीद्वारे नवे भविष्य घडवण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

पारंपरिक हंगामी पिकांच्या तुलनेत अधिक टिकाऊ आणि नफा देणारे पीक

भारतात प्रामुख्याने ईशान्येकडील राज्यात बांबू लागवड मोठ्याप्रमाणावर होत असली तरी महाराष्ट्रातही अलीकडे बऱ्याच प्रमाणात होऊ लागली आहे. महाराष्ट्र राज्याने पुढाकार घेऊन भरघोस अनुदान असलेली महत्वाकांक्षी “बांबू लागवड योजना” राबविण्यात येत आहे. बांबू लागवड ही जलसंधारणक्षम, हवामान बदलास तोंड देणारी आणि मातीची धूप रोखणारी शेती पद्धती मानली जाते. बांबूचे झाड एकदा लागवड केल्यानंतर ७ ते १० वर्षे सातत्याने उत्पन्न देऊ शकते, त्यामुळे पारंपरिक हंगामी पिकांच्या तुलनेत अधिक टिकाऊ आणि नफा देणारे पीक ठरते.

बांबूपासुन कापड निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न

बांबूपासून केवळ काठी किंवा सजावटीची सामग्रीच नव्हे, तर कागद निर्मिती, अगरबत्ती, बांबू फर्निचर, चारकोल ब्रिकेट्स, बांधकाम साहित्य, पॅकेजिंग मटेरीअल, हस्तकला उत्पादने, सेंद्रिय पेंढा व फळबाग संरक्षक साहित्य यांसारखी अनेक उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे बांबू लागवड ही उत्पन्नासोबतच ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीचे प्रभावी साधन ठरते. तर सध्या बांबूपासुन कापड निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी बांबू लागवडीला प्राधान्य देण्याचे काम करण्यात येत आहे.

कुठे किती हेक्टर लागवड ?

तालुका निहाय

कल्याण – १००

उल्हासनगर – १००

भिवंडी – २५०

मुरबाड – ३००

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहापूर – ३५०