उल्हासनगर : आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उल्हासनगरच्या राजकारणात एक मोठी घोषणा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपाने येत्या पालिका निवडणुका एकत्र लढण्याबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही. मात्र उल्हासनगर शहरात शिवसेनेच्या वतीने भाजप नाही तर भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या टीम ओमी कलानी गटासोबत युतीची घोषणा केली आहे.
लोकसत्ताने लोकसभा निवडणुकीनंतर पालिका निवडणुकीत हे समीकरण आकाराला येईल असे भाकीत केले होते. त्यानंतर शनिवारी शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आली. दोस्ती का गठबंधन असे नाव याला लोकसभा निवडणुकीत देण्यात आले होते.
उल्हासनगर शहरात प्राबल्य असलेल्या कलानी कुटुंबाच्या ताकदीची गरज सर्वच पक्षांना पालिका किंवा इतर कोणत्याही निवडणुकीत लागत असते. सत्तेपासून दूर असले तरी कलानी कुटुंबाने आपली ताकद कायम ठेवली आहे. काही वर्षांपूर्वी सुरेश उर्फ पप्पू कलानी पुन्हा राजकारणात सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत पप्पू कलानी यांनी थेट विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन इशारा दिला होता. त्यानंतरही भाजपच्या कुमार आयलानी यांचा विजय झाला. मात्र शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये आजही कलानी गटाचे वर्चस्व आहे.
कलानी आणि शिवसेना शिंदे गटाची जवळीक सर्वश्रृत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कलानींनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी महायुतीपासून अंतर ठेवत फक्त शिवसेनेला पाठिंबा असे कलानींनी जाहीर केले होते. त्यामुळे कलानींची पाठिंबा सभा स्वतंत्रपणे झाली. त्या मंचावर पहिल्यांदा एकनाथ शिंदे गेले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कलानींचा शिवसेनेला पाठिंबा होता मात्र ते महायुतीत नव्हते. त्याला त्यांनी दोस्ती का गठबंधन असे नाव दिले होते. ही युती लोकसभेनंतरही कायम राहिली.
काही दिवसांपूर्वी चालिया उत्सवाच्या निमित्ताने उल्हासनगरात आलेले शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी सारथ्य करत असलेल्या वाहनातून प्रवास केला होता. तर स्थानिक समस्यांसाठी कलानींनी शिंदे यांचे निवासस्थानही गाठले होते. त्यामुळे आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीत टीम ओमी कलानी शिवसेनेशी युती करतील अशी दाट शक्यत होती.
दोनच दिवसांपूर्वी भाजपने टीम ओमी कलानीच्या काही पदाधिकाऱ्यांना गळाला लावले. त्यानंतर शनिवारी टीम ओमी कलानी आणि शिवसेनेच्या वतीने पालिका निवडणुकीसाठी दोस्ती का गठबंधन जाहीर करण्यात आले. पालिका निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे राज्यात एकत्र असलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात अद्याप पालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा झालेली नाही. त्यात उल्हासनगर शहरात टीम ओमी कलानी आणि भाजपात वैर वाढले आहे. त्यामुळे येत्या काळातही त्यांची युती होणे शक्य नाही असे बोलले जाते. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांविरूद्ध लढताना दिसण्याची दाट शक्यता व्यक्त होते आहे.
कालानी बंगल्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र चौधरी, अरुण आशान, राजेंद्र भूल्लर महाराज, कलानी गटाचे सर्वेसर्वा ओमी कालानी, कमलेश निकम, रमेश चव्हाण, मनोज लासी, राजेश टेकचंदानी आणि सुमित चक्रवर्ती यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.