बदलापूर : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेले बदलापुरकर दिपक पाठक यांना शनिवारी बदलापुरकरांनी शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. दिपक पाठक हे एयर इंडियाचे कर्मचारी आणि अहमदाबाद लंडन विमानात असलेल्या १२ क्रु मेंबरपैकी एक होते. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी कुटुंबियांसह मित्र परिवार, एयर इंडियातील सहकारी आणि बदलापुकर उपस्थित होते.

एयर इंडियाचे अहमदाबाद ते लंडन हे विमान १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असतानाच दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात एअर इंडियाच्या विमानातील क्रु मेंबर दीपक पाठक (३४) यांचाही मृत्यू झाला होता. दिपक पाठक हे बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरात राहणारे होते. या अपघातानंतर बदलापुरात हळहळ व्यक्त होत होती. विमान अपघाताची भीषणतेमुळे विमान दुर्घटनेला आठवडा उलटूनही अनेक मृतदेहांची ओळख पटत नव्हती. त्यामुळे येथे डीएनए चाचणी केली जात होती. मात्र या चाचणीतही दिपकच्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती.

डीएनए चाचणीत येणाऱ्या अडचणींमुळे सुरूवातील बहिणीचे नमुने घेतले. त्यानंतर आई-वडिलांच्या डीएनएचे नमुने घेण्यात आले. त्यात आईचा डीएनए लगेचच जुळल्याने दिपक यांची ओळख पटली, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. त्यानंतर दिपक यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दोन विवाहित बहिणी, भावोजी हे आठ दिवसांपासून अहमदाबाद येथे थांबले होते. दिपकच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी उशिरा त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निकवर्तीयांनी दिली.

दिपक यांचा मृतदेह बदलापुर येथे आणण्यासाठी एअर इंडियाच्या वतीने विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास दिपक यांचा मृतदेह बदलापूर येथील राहत्या घरी आणण्यात आला. अंत्ययात्रेपूर्वी अंतिम दर्शनासाठी काही वेळ मृतदेह घरी ठेवण्यात आला होता. यावेळी अनेक राजकीय पदाधिकारी, नातेवाईक, एयर इंडियातील सहकारी आणि बदलापुकरांनी दर्शन घेतले. पुढे बदलापूरच्या मांजर्ली येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक जण भाऊक झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.