डोंबिवली – अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील हवाई सेविका रोशनी सोनघरे हिचा मृत्यू झाला. उपवर झाल्याने रोशनीच्या आई, वडिल आणि कुटुंबीयांनी तिच्या विवाहाची तयारी सुरू केली होती. एक सुस्वरुप उच्चशिक्षित मुलाबरोबर रोशनीच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार होत्या. येत्या नोव्हेंबरमध्ये साखरपुडा करून पुढील वर्षी मार्चमध्ये रोशनीचा विवाह करण्याचे नियोजन केले जात होते. आणि त्यापुर्वीच ही दुर्घटना घडली, अशी माहिती रोशनीच्या एका नातेवाईकाने माध्यमांना दिली.
रोशनीच्या घरात वडील राजेंद्र सोनघरे (५०), आई शोभा आणि रोशनीचा भाऊ विघ्नेश असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूष म्हणून रोशनी होती. तिचा भाऊ एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. परिस्थितीवर मात करत राजेंद्र सोनघरे यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण दिले. रोशनी कष्टाळू आणि मेहनती होती. यापूर्वी सोनघरे कुटुंब मुंबईत राहत होते. ते दोन वर्षापूर्वी डोंबिवलीत राजाजी रस्ता भागात राहण्यास आले. सोनघरे कुटुंब मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील आहे. नोकरीच्या निमित्ताने हे कुटुंब मुंबईत पूर्वीच आले होते.
रोशनीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर हवाई सेविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिला या विषयीची शालेय जीवनापासून आवड होती. हवाई सेविकाचा अभ्यासक्रम, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती स्पाईस जेट विमान कंपनीत सुरूवातीला लागली. विमानातील विदेश दौऱ्यांची रोशनीला आवड होती.नंंतर ती एअर इंडियात दाखल झाली. तिचे विमान सेवेत प्राधान्य विदेशातील फेऱ्यांना होते. अहमदाबाद-लंडन विमानावर कर्तव्य असल्याने तिने तीन दिवसापूर्वीच तेथील वेळेप्रमाणे डोंबिवलीतून निघून अहमदाबाद येथे ती पोहचली होती.
अहमदाबाद लंडन विमानाला अपघात झाल्याचे कळताच, त्याच विमानात आपली मुलगी कर्तव्यावर होती याची माहिती कुटु्ंबीयांना होती. या अपघातानंतर रोशनीचा मोबाईल कुटुंबीयांना लागत नव्हता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या रोशनीच्या वडील, भावाने तात्काळ अहमदाबाद गाठले. रोशनीच्या घरी तिचे मामा प्रवीण सुखदरे, काका आणि इतर नातेवाईक मंडळी दाखल झाली आहेत. घरात शोकाकुल वातावरण आहे. रोशनीविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती कळत नाही. त्यामुळे आम्हाला सकारात्मक आशा आहेत, असा विश्वास सोनघरे कुटुंबीयांना आहे.
मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या एका उच्चशिक्षित तरूणा बरोबर रोशनीच्या रेशीमगाठी बांधल्या जाणाऱ्या होत्या. येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये रोशनीचा साखरपुडा करून पुढील वर्षी मार्चच्या दरम्यान तिचा विवाह करण्याची बोलणी कुटुंबीयांनी सुरू केली होती. रोशनीने पसंत केलेला वर कोकणातील गुहागर तालुक्यातील होता. तो सध्या ठाण्यात राहतो. नातेसंबधात हे लग्न जुळले होते, असे कुटुंबीय सांगतात. कष्ट, कठोर मेहनतीने शिक्षण घेऊन नोकरीत स्थिरावून जोडीदारा बरोबर जीवनाच्या वाटचालीची तयारी करत असताना रोशनीवर काळाने घातल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
रोशनी इन्स्टाग्रामवर प्रभावक (इन्फ्लुएन्सर) होती. तिला ५४ हजार अनुयायी होते. अपघाती विमानात रोशनी असल्याचे समजताच तिच्या चाहत्यांनी समाज माध्यमातील तिच्या खात्यावर शोक व्यक्त केला आहे.