ठाणेकर रसिकांना नाटय़संमेलनात विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी
पहाटेच्या प्रहरी रंगणारी तलावाकाठची मैफल, नाटय़संगीताचा कर्णमधुर सूर, लहानग्यांचा नाटय़ाविष्कार, तरुणाईच्या उत्साहाचे दर्शन घडवणाऱ्या एकांकिकांचे सादरीकरण, एकपात्री आविष्कार, रंगभूमीच्या भविष्याविषयी विचारमंथन आणि रंगभूमीचे पूर्वरंग उलगडणारे कलाविष्कार..या व अशा भरगच्च कार्यक्रमांनी ९६व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचा दुसरा दिवस साजरा झाला. अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावे आणि शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या ‘सूर निरागस हो..’ या बहारदार नाटय़संगीताच्या मैफलीने ठाणेकरांची पहाट सूरमयी झाली. मासुंदा तलावातील या तरंगत्या रंगमंचावर संध्याकाळी शहरातील कलाकारांनी बहारदार नृत्य सादर केले.
नाटय़ संमेलनाच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सुरांच्या साथीने होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध ठिकाणी नाटकाचे विविध प्रकार सादर होत आहेत. मासुंदा तलावातील रंचमंच, दादोजी कोंडदेव स्टेडियममधील मुख्य नाटय़नगरी, गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह आणि टाउन हॉल या शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर एकामागोमाग एक कार्यक्रम सादर झाले.
कार्यक्रमाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नाटय़ संमेलनामध्ये सहभाग नोंदवला. एकाच वेळी शहरातील अनेक भागांमध्ये कार्यक्रमांचे सादरीकरण करण्याचा यशस्वी प्रयोग यानिमित्ताने येथे दिसून येत होता.
नाटय़ाविष्कारांची रेलचेल..
नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने नाटकांची रेलचेल शहरातील नाटय़गृहांमध्ये होती. सकाळी गडकरी रंगायतनच्या व्यासपीठावर ‘नाटय़ परिषद शिफारसपात्र तीन बालनाटय़े’ सादर करण्यात आली, तर डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये ‘राज्य शासन शिफारसपात्र एकांकिकां’ची रेलचेल सुरू होती. टेंभी नाका येथील टाउन हॉलच्या रंगमंचावर दिवसभर ‘एकपात्री आविष्कार’ सादर करण्यासाठी एकपात्री कलाकारांची उपस्थिती होती.
‘कटय़ार’ची मोहिनी..
* महेश काळे यांची नाटय़पदे आणि सुबोध भावेंचे कविता वाचन यांची अनोखी जुगलबंदी या निमित्ताने पाहायला मिळाली
* मंगेश पाडगावकर, सुरेश भट, कुसुमाग्रजांच्या कवितांनी सुबोध भावे यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला.
* माझे जीवनगाणे, ‘कणा’ यांसारख्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
ल्ल तेजोनिधी लोह गोल, नाथ हा माझा, घेई छंद मकरंद, मन मंदिरात तेजानेसारख्या नाटय़पदांनी रसिकांना कर्णमधुर संगीताचा रस ग्रहण करता आला.
* ‘बालगंधर्वा’च्या निर्मितीची कथा सुबोध भावे यांच्या तोंडून ऐकण्याची अनोखी संधी इथे रसिकांना घेता आली.