scorecardresearch

अध्यक्षीय भाषणात मागण्यांचीच जंत्री!

९७ व्या अ.भा. मराठी नाटय़ संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन

अध्यक्षीय भाषणात मागण्यांचीच जंत्री!
नाटय़संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणांची पूर्वपीठिका मोडत जयंत सावरकर यांनी फक्त नाटय़ व्यवसायासमोरील समस्यांनाच थेटपणे हात घातला.

९७ व्या अ.भा. मराठी नाटय़ संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन

नाटय़सृष्टीतील आणि नाटय़कर्मीसमोरील विविध समस्यांचा ऊहापोह आणि त्यावरील काही उपाययोजना यांची जंत्री वजा यादी सादर करीत ९७ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे आपल्यातील कार्यकर्ता- अभिनेत्याचे दर्शन घडविले. तथापि, आपल्या या मागण्यांची पुढील संमेलनापर्यंत कुणीही दखल घेणार नाही आणि ‘सुखं शंते’ म्हणत डोक्यावर पांघरूण ओढत निद्राधीन होतील, असा उपरोधिक टोलाही त्यांनी भाषणाचा समारोप करताना मारला.

९७ व्या अ.भा. मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे मावळते संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्याकडून स्वीकारताना जयंत सावरकर यांनी आपल्याला अवघा सात- आठ महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार असल्याची खंत बोलून दाखविली.

नाटय़संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणांची पूर्वपीठिका मोडत जयंत सावरकर यांनी फक्त नाटय़ व्यवसायासमोरील समस्यांनाच थेटपणे हात घातला. रंगभूमीचा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राच्या चर्वितचर्वणाला फाटा देऊन त्यांनी नाटक धंद्यातील आपला प्रदीर्घ अनुभव, त्यात सहन कराव्या लागत असलेल्या अडीअडचणी, रंगकर्मीची सद्य:अवस्था आणि त्यावरील मार्ग काय असू शकतात याची चर्चा आपल्या छोटेखानी भाषणात केली.रंगमंच कामगारांना परवडणारी घरे मिळावीत व त्यासाठी आर्थिक बळ कसे उभारावे याचा ऊहापोह करून त्यांनी या कामगारांच्या उतरविल्या जाणाऱ्या विमा योजनेकरता संबंधितांनी एकत्र येऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी सूचना केली. त्याचप्रमाणे नाटय़व्यवसायातील ठेकेदारी पद्धत बंद झाल्याने गावोगावी जाणारी मराठी नाटके बंद झाली आहेत. तरी गावोगावच्या नाटकाशी संबंधित संस्था आणि व्यक्तींना यासाठी उत्तेजन देऊन गावागावांत नाटकांचे प्रयोग करता येतील असा मार्गही त्यांनी सुचविला. प्रेक्षकांना ५०० रु. तिकिट दर परवडत नसल्याने तो कमी करण्यासाठी निर्माते व बाहेरगावचे व्यवस्थापक यांच्यात सकारात्मक विचारविनिमय व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नाटय़गृहांच्या भाडय़ावरही त्यासाठी मर्यादा आणायला हवी असे ते म्हणाले. त्याचबरोबर नाटय़गृहांच्या स्थितीबद्दल वारंवार होणारी ओरड लक्षात गेता सरकारने आणि नगरपालिकांनी त्यांची नाटय़गृहे नाटय़ परिषदेच्या ताब्यात द्यावीत आणि त्यांच्या देखभालीसाठीचा खर्च नाटय़ परिषदेस द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

शालेय अभ्यासक्रमात अभिनय या विषयाचा समावेश करावा; जेणेकरून त्यातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल असे ते म्हणाले. त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक, आमदार- खासदार यांना असलेल्या सोयी सवलती नाटय़ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या जाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. राज्य शासनाच्या नाटय़ स्पर्र्धाना नेमल्या जाणाऱ्या परीक्षकांची अर्हता तपासून त्यांना योग्य ते मानधन व सोयीसुविधा दिल्या जाव्यात असेही त्यांनी सुचविले. निवृत्त रंगकर्मीना दिल्या जाणाऱ्या पेन्शनबद्दल उपरोधिकपणे समाचार घेताना ‘हे निवृत्तीवेतन आणखी कमी करून कलावंतांना अधिक श्रम करण्यास उद्युक्त करावे,’ असा टोला दिला.

मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

उष्म्याचा पारा चढत्या भाजणीने वर वर सरकत असताना अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे ९७ वे नाटय़ संमेलन येथे भरत आहे. गेला आठवडाभर विविध नाटय़ उपक्रम आणि नाटय़ महोत्सवाने संमेलनपूर्व वातावरणनिर्मिती झाली असली तरी एकुणात ग्रामीण भागात होणारे संमेलन म्हटल्यावर नियोजित वेळेवर कुठलेच कार्यक्रम पार न पडण्याची परंपरा येथेही कायम असल्याचा अनुभव येत आहे. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहाच्या नूतनीकृत वास्तूचा शुभारंभ सोहळा नियोजित वेळेवर सुरू होऊ शकला नाही. आधीच इथल्या असह्य़ तापमानाचा धसका घेऊन अनेकांनी नाटय़ संमेलनाकडे पाठ फिरवलेली असताना या ‘विलंबित’ ख्यालामुळे उरल्यासुरल्या रसिकांचाही हिरमोड झाला. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे जाहीर झाले होते; परंतु त्यांनीही संमेलनाकडे पाठ फिरवल्याचे कळल्यावर उस्मानाबादकरांचा निम्मा उत्साह कमी झाला आहे. त्याचबरोबर नाटय़ संमेलन कुठेही असो आणि शरद पवार सत्तेत असो-नसोत; त्यांची संमेलनास हजेरी लागली नाही असे सहसा घडलेले नाही; परंतु यंदा त्यांनीही या संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. एकुणात अनेक कारणांनी पुढे पुढे ढकलले गेलेले हे नाटय़ संमेलन ‘उरकण्या’चा सोपस्कार पार पाडला जात आहे अशी नाटय़रसिकांची भावना आहे.

आज सकाळी मुख्य संमेलनस्थळास भेट दिली असता एका शासकीय वाहनातून लोकांना शहरातील वाढत्या उष्म्यासंदर्भात सावधगिरीची उपाययोजना म्हणून उद्घोषणेद्वारे कळविण्यात येत होते की, लोकांनी अगदीच निकड असल्याशिवाय दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये. त्यामुळे संमेलनातील कार्यक्रमांनाही दुपारच्या वेळेत विश्रांती देण्यात आली आहे.

 

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-04-2017 at 01:20 IST
ताज्या बातम्या