काळानुरूप फॅशनचे अवतार आणि संकल्पनाही बदलतात. आता चेहऱ्याचे सौंदर्य खुलविणारी सौंदर्यप्रसाधने अथवा वस्त्रप्रावरणांपुरती फॅशन मर्यादित राहिलेली नाही. व्यक्तीसोबत असणाऱ्या इतर वस्तूंची ठेवणही फॅशन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. घराबाहेर पडणाऱ्या बहुतेक व्यक्तींच्या हाती एखादी पिशवी, झोळी अथवा बॅग असतेच. रिकाम्या हाताने दिसणाऱ्या व्यक्ती दुर्मीळच. पूर्वी कोणत्याही कारणासाठी सरसकट कापडी पिशवी वापरली जायची. घरातील कर्ती व्यक्ती कामावरून येताना भाजी आणण्यासाठी तसेच शाळेत जाणारी मुले वह्य़ा-पुस्तके नेण्यासाठी या पिशवीचा वापर करीत. दप्तरनामक शालेय बॅग त्या वेळी फारशी प्रचलित नव्हती. पुढे स्मार्ट जीवनशैलीत काहीशी गबाळी दिसणारी पिशवी हळूहळू मागे पडून त्या जागी आता नव्या आकर्षक बॅग्ज् येऊ लागल्या आहेत..

शर्ट्स, पँट किंवा घडय़ाळाबरोबरच सदैव सावलीसारखी सोबत करणारी ‘बॅग’ ही आता तरुणाईचे नवे स्टेट्स सिम्बॉल ठरू लागली आहे. तुमच्या बॅगवरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा केली जात आहे. पूर्वीच्या काळी प्राण्यांची कातडी, कापड आणि झाडांच्या तंतूपासून बॅग्ज् बनवल्या जात होत्या. मात्र कालांतराने त्यात बदल होऊन आता प्रक्रिया केलेली कातडी, पॉलिस्टर यांसारख्या विविध गोष्टींपासून बॅग्ज् बनवल्या जातात. शाळा व महाविद्यालयात मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये उठून दिसण्यासाठी कपडय़ांबरोबरच निरनिराळ्या पद्धतीच्या बॅग तरुण-तरुणी वापरतात. सध्या तर विविध प्रकारच्या ट्रेंडी व फॅशनेबल ब्ॉग वापरण्यावर तरुणाई भर देत आहे. बॅग्स्मध्ये प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे विविध प्रकारचे रंग व  वैशिष्टय़पूर्ण टेक्चरसुद्धा उपलब्ध असते. सर्वसाधारणपणे भारतीय जीवनशैलीत लाइट वेट म्हणजेच कमी वजनाच्या बॅग बनवल्या जातात.

स्कूल बॅग किंवा दप्तर हा शालेय जीवनातील एक जिव्हाळ्याचा विषय असतो. दप्तरामध्ये वह्य़ा-पुस्तके, कंपास, डबा अशा शाळेच्या तत्सम गोष्टी ठेवण्यासाठी मल्टी कम्पार्टमेंट म्हणजेच ४ ते ५ कप्पे असतात. दरवर्षी त्यात नावीन्यपूर्ण डिझाइन्स येतात. शाळकरी मुलांना वह्य़ा-पुस्तकाचे व इतर गोष्टींचे वजन जाणवू नये म्हणून स्कूल बॅग या सहसा पॉलिस्टर मटेरिअलपासून तयार केल्या जातात. काही शाळांमध्ये विशिष्ट रंगाच्याच बॅग वापराव्यात असा दंडक आहे. मात्र बॅगेची रचना आणि पोत यामध्ये विविधता असते.ह्ण

ट्रॅव्हलिंग बॅग

प्रवासासाठी ट्रॅव्हलिंग बॅग अधिक प्रमाणात वापरल्या जातात. ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये केबिन लगेज बॅग व मुख्य लगेज बॅग असे दोन प्रकार असतात. ‘इझी टु कॅरी’ असलेल्या केबिन लगेज बॅगची १० ते १२ किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असते. त्यामध्ये आपण आपणास पटकन लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवू शकतो. वजनाने हलक्या असणाऱ्या लगेज बॅग म्हणजे चेक-इन बॅगमध्ये आपण कपडे व प्रवासाच्या वेळी लागणाऱ्या किरकोळ वस्तू ठेवू शकतो. २०, २२ आणि २४ इंचांमध्ये उपलब्ध असलेल्या या बॅगेत ३ ते ४ कप्पे असतात व त्याचबरोबर या बॅगेत आयत्या वेळीही जास्तीचे सामान भरता येत असल्याने याला एअर बॅग असेही म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून लगेज बॅगेला लावण्यात आलेल्या चाकांमुळे प्रवाशांच्या खांद्यावरील ओझे कमी होण्यास मदत होते.

ट्रेकिंग बॅग

लांबच्या प्रवासासाठी अथवा विशेषत: ट्रेकिंग करणाऱ्यांमध्ये ट्रेकिंग बॅग सर्वाधिक प्रचलित आहे. चार ते पाच कप्पे असलेल्या या बॅगेत कपडे किवा ट्रेकिंग टेंट (तंबू) ठेवण्यासाठी एक मोठा कप्पा असतो. त्याचबरोबर शूज व बॉल ठेवण्यासाठी वेगवगळे कप्पे व स्लीपिंग बॅग ठेवण्यासाठीही एक स्वतंत्र कप्पा असतो. ट्रेकिंग बॅग या अधिक वजन वाहून नेत असल्याने जास्त संरक्षण म्हणून खांद्यावरील दोन पट्टय़ांबरोबर कंबरेलाही अधिकचा एक पट्टा असतो.

बेबी बॅग

नाव बेबी बॅग असले तरी ती पालकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मोठय़ा सुट्टीनंतर मुले स्वाभाविकपणे शाळेत जाण्याचा कंटाळा करतात. अशा वेळी त्यांनी शाळेत जावे म्हणून पालक मुलांना त्यांच्या पसंतीच्या बेबी बॅग घेतात. त्यामुळे बच्चे कंपनी खूश होते. ज्युनिअर व सीनिअर केजीच्या मुलांसाठी असलेल्या या बेबी बॅगमध्ये मुलांची खेळणी, त्याचे छोटे-मोठे सामान व पाण्याची बाटली ठेवण्यासाठी दोन ते तीन कप्पे असतात. एकाच साइज व शेपमध्ये असलेली ही बॅग त्यावर असलेल्या कार्टुन्सच्या चित्रांमध्ये मुलांना आवडते.

बॅगपॅक

सर्व वयोगटांतील लोकांमध्ये व विशेषत: महाविद्यालयीन मुलांमध्ये वजनाने हलकी व सर्वसाधारण प्रकारातील ‘बॅग पॅक’ लोकप्रिय आहे. कॉलेज बॅग, पिकनिक बॅग, किट बॅग, बुक बॅग अशा वेगवेगळ्या नावांनीही बॅग पॅक सर्वपरिचित आहे. ‘ऑल इन वन’ असलेल्या या बॅग पॅकचे वैशिष्टय़ म्हणजे तिचा रफ अ‍ॅण्ड टफ आणि फॅन्सी लुक. त्याचबरोबर खेळाचे व पिकनिकचे साहित्य मावेल अशा हिशेबाने त्यामध्ये पाच ते सहा कप्पे (मल्टी कम्पार्टमेंट) असतात. या बॅगमध्ये आपण वह्य़ा पुस्तकांबरोबरच व्हॉलीबॉल, फुटबॉल व कपडे अशा सर्व प्रकारच्या गरजेच्या गोष्टी ठेवू शकतो. तसेच पिकनिक बॅगमध्ये लहान मुलांच्या सामानासाठी विशेष कप्पा असल्याने पिकनिकला जाताना आपले बॅगचे ओझे कमी होते. फॅमिली पिकनिक, फ्रेंड्स पिकनिक अशा विविध प्रकारच्या सहलींसाठी निरनिराळ्या साइजच्या बॅगा बाजारात उपलब्ध आहेत.

स्लिंग  बॅग

महाविद्यालयीन तरुण तरुणींमध्ये इझी टू कॅरी असलेल्या वन साइड बॅग स्लिंग या सुप्रसिद्ध आहेत. वह्य़ा पुस्तक वाहून नेण्यासाठी वजनाला हलक्या असणाऱ्या या बॅग खूप सुखकर पडतात. या बॅगचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात असलेले ४ ते ५ कप्पे. खांद्यावर टाकून किंवा हातात पकडूनही आपण त्या नेऊ शकतो. हलक्या वजनामुळे खांद्यावर ताणही येत नाही. विविध रंगांमध्ये उपलब्ध असणारी ही बॅग तरुणींना विशेष करून आवडते. कारण त्यावर वारली पेंटिंग, विविध रंगांची शेडींग असते. अशा बॅगेवरील वैशिष्टय़पूर्ण पोत तिचे सौदर्य खुलवितो.

कॉर्पोरेट लूकची लॅपटॉप बॅग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यालय किंवा कॉर्पोरेट विश्वात काम करणाऱ्या लोकांमध्ये लॅपटॉप बॅग व वन साइड ऑफिस बॅग प्रचलित आहेत. फाइलच्या आकाराची, दोन-तीन कप्पे असलेली वन साइड ऑफिस बॅग फाइल्स किंवा कागदपत्रे ठेवण्यासाठी फार उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे तीन ते चार कप्पे असलेल्या लॅपटॉप बॅगमध्ये फाइल्स किंवा कागदपत्रांबरोबरच लॅपटॉप ठेवण्यासाठी विशेष प्रकारचा कुशन (उशीच्या आकाराचा) असलेला कप्पाही असतो. या बॅगा विविध आकारात उपलब्ध आहेत.