अंबरनाथ : अंबरनाथ शिवसेनेचे नेते अरविंद वाळेकर यांच्यावर २०११ वर्षात शिवसेना शाखेत झालेल्या हल्ल्याप्रकरणातील एका आरोपीला तब्बल १४ वर्षांनी अटक करण्यात आली आहे. ठाणे शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाने तब्बल १४ वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या फरार आरोपीला गुजरातमधून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. भैय्याजी उर्फ राजेश रामशिरोमणी शुक्ला (वय ५१, मूळगाव – सुकुलपूर, जिल्हा सुलतानपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. सुरत, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
२४ नोव्हेंबर २०११ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता अंबरनाथ (पूर्व) येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसेनेचे अरविंद शिवलिंग वाळेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. २३ नोव्हेंबर २०११ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास वाळेकर शिवसेना शाखा, अंबरनाथ (पूर्व) येथे आले असताना दोन अज्ञात इसमांनी शाखेमध्ये प्रवेश करून रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. यात वाळेकर यांचा अंगरक्षक शामसुंदर यादव याचा मृत्यू झाला.
यानंतर दुसरा अंगरक्षक राकेश यादव याने स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रत्युत्तर गोळीबारात आरोपी मनिष कुमार उर्फ बबलू झा/शर्मा ठार झाला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. अंबरनाथ शहरातील रक्तरंजित इतिहास पाहता या घटनेने मोठा गदारोळ झाला होता.
या घटनेत बबुसिंग उर्फ नंदलाल शहा, ब्रिजेश हर्षबहादुर सिंग, प्रदीप जावरेकर, राजेश उर्फ गोरखनाथ सिंह या आरोपींना अटक झाली होती. मात्र मुख्य आरोपींपैकी भैय्याजी उर्फ राजेश शुक्ला हा १४ वर्षे फरार राहून पोलिसांना चकवा देत होता.
गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासातून शोध
मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षातील दादासाहेब पाटील यांनी समांतर तपास करत आरोपीच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी सुरत जिल्ह्यात पलसाना येथे राहत असल्याची खात्री पटली. वरिष्ठांच्या परवानगीने पोलिस पथक गुजरातला रवाना झाले. १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी पलसाना चौक, सुरत येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने भैय्याजी शुक्ला याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ (पूर्व) येथे हजर करण्यात आले.
ही कारवाई ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-२) विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही धाडसी कारवाई मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरेश माळोदे, दादासाहेब पाटील, दिनकर सांवत, अंकुश शिंदे आणि मयुर शिरसाट या पथकाने केली.