हॉटेलमध्ये सिगारेट ओढणाऱ्याला रोखल्याने त्याने हॉटेलमधील वेटर आणि चालकावर चाकुहल्ला केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. जयेश सोनावणे असे आरोपीचे नाव असून या प्रकारानंतर या आरोपीला हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीही चोप दिल्याचे कळते आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चाकू हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पूर्वेकील मराठा शाही दरबार या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री अकराच्या सुमारास आरोपी जयेश सोनावणे जेवणासाठी गेला होता. यावेळी जयेश सोनावणेने हॉटेलमध्येच सिगारेट ओढण्यास सुरूवात केली. त्याला हॉटेलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याने विरोध केला. या विरोधाचा राग आल्याने त्याने अनिल मराडे या हॉटेल चालकास शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी त्याने त्याच्या जवळील छोटा चाकू काढून येथे असलेल्या कर्मचारी ओमकार काशीद याच्या पाठीवर, हाताच्या बोटावर चाकूने हल्ला करत दुखापत केली. यावेळी आरोपीने हॉटेलातील सामानाचीही नासधूस केली.

यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीही चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला चोप दिला. याप्रकरणी हॉटेलचालक अनिल मराडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी जयेश सोनावणे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.