अंबरनाथः पावसाळा थांबताच मोकळा श्वास घेण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक वायूमुळे घरात स्वतःला बंद करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथच्या पश्चिमेतील मोरिवली औद्योगिक वसाहतीतून रासायनीक वायू सोडला जात असून मंगळवारीही मोठ्या प्रमाणावर वायू गळती पाहायला मिळाली. परिणामी अंबरनाथ पूर्व, पश्चिम भागात धुराचे साम्राज्य पसरले होते. यातून रासायनिक दर्प येत होता. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लाहले.
गेल्या काही वर्षात अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये औद्योगिक प्रदुषणाचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. नाले, नद्यांमध्ये सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने प्रदुषण वाढते आहे. परिणामी नद्यातील जलचरांना त्याचा फटका बसतो. अंबरनाथसारख्या शहरात वालधुनी नदीतही काही दिवसांपूर्वीच रासाययनिक सांडपाणी सोडल्याने नदीचा रंग पिवळा झाला होता. तर गेल्या काही दिवसांपासून वायू गळतीने अंबरनाथमध्ये डोके वर काढले आहे.
अंबरनाथ शहराच्या मोरिवली परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतून सातत्याने रासायनिक वायू सोडला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिमेतील बहुतांश भागाला दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गेल्या शुक्रवारी अंबरनाथच्या याच भागातून वायू सोडण्यात आला होता. तर मंगळवारीही रात्री रासायनिक वायू सोडण्यात आला. त्यामुळे अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका, विमको नाका, मोरिवली, पूर्वेतील बी केबिन रस्ता, निसर्ग ग्रीन, ग्रीन सिटी, मोरीवली गाव आणि आसपासच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. या धुरामुळे दृश्यमानताही घटल्याचे दिसून आले. सर्वत्र धुराचे साम्राज पहायला मिळत होते. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला आणि दुर्गंधीला सामोरे जावे लागले.
गेल्या पाच महिन्यात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे घराबाहेर मोकळ्या हवेत फेरफटका मारणे अवघड होऊन बसले होते. मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे नागरिक, लहान, ज्येष्ठांसह घराबाहेर पडण्याला पसंती देत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक वायूमुळे नागरिकांना पुन्हा घरात बसून राहावे लागते आहे. मंगळवारीही रसायनाचा उग्र दर्प जाणवत होता. त्यामुळे ज्येष्ठ आणि लहान मुलांना त्रासाला सामोरे जावे लागले.
कंपन्या नागरिकांना मोकळ्या हवेत फिरू देणार आहेत की नाही, असा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात होता. सातत्याने होणाऱ्या या प्रकारांमुळे संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.