अंबरनाथ : येथील तालुक्यातील वसार परिसरात गावठी दारूच्या भट्टीवर कारवाई करिता गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर गावठी दारू तस्कराकडून मंगळवारी दुपारी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या पथकातील एका अधिकाऱ्यास धक्काबुक्की करण्यात आली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी अविनाश वायले याला अटक करण्यात आली आहे.
गावठी दारू निर्मिती आणि वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उल्हासनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वसार गावाजवळील जंगलपट्ट्यात कारवाईचे नियोजन केले होते. यावेळी निरीक्षक शरद भोर यांच्या नेतृत्वाखालील पथक तस्करीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी दाखल झाले. मात्र कारवाईदरम्यान अविनाश वायले या इसमाने प्रत्यक्ष उत्पादन शुल्क अधिकाऱ्याशी झटापट करत धक्काबुक्की केली.
या गंभीर घटनेनंतर शरद भोर यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावरून आरोपी वायलेविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक काटकर करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण, अंबरनाथ परिसरातील ग्रामीण पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचे अड्डे उभे राहत असून, याठिकाणी तयार होणाऱ्या दारूची शहरी भागांमध्ये तस्करी केली जाते. यामुळे उल्हासनगर विभागाने सतत छापेमारीची मोहीम सुरू ठेवली आहे. परंतु अशा कारवायांदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांवरच हात उचलला जाऊ लागल्याने दारू माफियांना शह देणं अधिक कठीण होत चाललं आहे.
या घटनेमुळे दारूबंदी आणि तस्करीविरोधी मोहिमेला खिळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.