अंबरनाथ: केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेत राष्ट्रीय उपजीविका अभियाना अंतर्गत अंबरनाथ नगर परिषद पालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या शहरी बेघर निवाऱ्याची सुविधा राज्यात आदर्श ठरते आहे. राज्याच्या नियंत्रण समितीने अंबरनाथ नगरपालिकेच्या या बेघर निवारा केंद्राचा समावेश सर्वोत्कृष्ट पाच निवारा केंद्र मध्ये केला आहे. सध्या या बेघर निवारा केंद्रात ३६ लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले असून त्यांची राहण्याची, जेवणाची आणि इतर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
बिगर व्यक्तींना निवारा देणे तसेच सन्मानजनक जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे त्यासाठी केंद्र सरकारची राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजना आहे. अंबरनाथ नगरपालिकेने केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी बेघर व्यक्तींसाठी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ पश्चिमेला अद्ययावत बेघर निवारा केंद्र उभारले. रस्त्यावर, पुलावर, रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या आणि कोणताही आधार नसलेल्या नागरिकांसाठी हा निवारा कायमस्वरूपी व्यवस्था म्हणून सुरू करण्यात आला. सध्याच्या घडीला ३६ व्यक्ती येथे राहतात. लाभार्थ्यांच्या देखभालीसाठी व्यवस्थापक आणि काळजीवाहक पालिकेच्या वतीने नेमण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिरे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना दिला जातो.
राज्यात पहिल्या पाचात केंद्र
अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केलेले हे केंद्र अनेकांसाठी फायद्याचे ठरले आहे. या उपक्रमामुळे अंबरनाथमधील बेघर नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवनशैली प्राप्त झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल नियंत्रण समितीने घेतली असून, महाराष्ट्रातील पाच सर्वोत्कृष्ट शहरी बेघर निवाऱ्यांमध्ये अंबरनाथची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड, बीड, अकोला, अंबरनाथ आणि बृहन्मुंबई या केंद्रांचा यात समावेश आहे. अंबरनाथ नगर पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या कामगिरीमुळे कौतुक होते आहे.