कल्याण – अंबरनाथ येथील फातिमा हायस्कूलमधील शिशु वर्गातील विद्यार्थ्यांची ओमनी वाहनातून वाहतूक करत असताना तीन मुले दोन दिवसापूर्वी वाहनाचा मागील दरवाजा अचानक उघडून रस्त्यावर पडली. ही मुले गंभीर जखमी झाली आहेत. या वाहन चालकाच्या बेदरकार आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याने कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओमनी वाहन चालकावर मंगळवारी दोन स्वतंत्र कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत.

संबंधित ओमनी वाहन उपप्रादेशिक परिवहन विभाग कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. सोमवारी सकाळी अंबरनाथ मधील फातिमा हायस्कूलमधील शिशु वर्गातील विद्यार्थी घेऊन एक ओमनी वाहन चालक सुसाट वेगाने कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरून चालला होता. यावेळी ओमनी वाहनाचा मागील दरवाजा अचानक उघडून मागच्या दाराजवळ बसलेली तीन मुले रस्त्यावर पडली. दरवाजा उघडून मुले पडली तरी त्याचे भान ओमनी वाहन चालकाला नव्हते.

पाठीमागून येणाऱ्या रिक्षा चालक आणि इतर नागरिकांनी ओरडा केल्यानंतर वाहन चालकाच्या घडलेला प्रकार लक्षात आला. तो पुढे ५० फूट जाऊन थांबला. त्यानंतर रिक्षा चालक आणि इतर नागरिकांनी जखमी तिन्ही मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हा अपघात घडुनही जखमी मुलांना रुग्णालयात सोडण्यास तयार नव्हता. त्याची मुलांना शाळेत सोडण्याची घाई होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

तिन्ही मुलांना गंभीर मार लागला आहे. एका मुलाच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांसाठी परिवहन विभागाची नियमावली आहे. त्याचे उल्लंघन केले म्हणून कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांनी या घटनेची चौकशी केली. त्यावेळी या मुलांची वाहतूक खासगी वाहनातून करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुळ यांच्या आदेशावरून ओमनी वाहन चालकाविरुध्द विद्यार्थ्यांच्या अपघातास कारणीभूत झाला आणि खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली म्हणून भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघात घडविणारे ओमनी वाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपली मुले शाळेत पाठविताना कोणत्याही खासगी, अनधिकृत, शालेय परवाना नसलेल्या वाहनांमधून पाठवू नयेत. अशी कोणी नियमबाह्य वाहतूक करून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळत असेल तर त्यांची तातडीने माहिती आरटीओ अधिकाऱ्यांना द्यावी. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याने दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल. – आशुतोष बारकुळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण