Ambernath Shiv Mandir : मुंबईसह, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह राज्यभरात तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे अंबरनाथ येथील प्रसिद्ध शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साठलं आहे. भगवान शंकराला जलाभिषेक झाला आहे असं सांगितलं जातं आहे. तसंच भगवान शंकराचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर आणण्यात आला आहे.

भगवान भोलेनाथाचा मुखवटा आणि नाग गाभाऱ्याबाहेर

प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरल्यामुळे भाविकांना गाभाऱ्यात जाणं शक्यच नाही. गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीवर असलेला भगवान भोलेनाथाचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर काढून ठेवण्यात आला आहे. या मुखवट्याचं दर्शन आणि पूजा सध्या भाविक करत आहेत. पाणी ओसरेपर्यंत कुणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं आहे. दरवर्षी मोठा पाऊस झाल्यानंतर वालधुनी नदीचा प्रवाह वाढल्याने मंदिराचा गाभारा जलमय झाला आहे.

अंबरनाथ येथील मंदिराचा थोडक्यात इतिहास

राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी इसवी सन १०६० या कालखंडात हे मंदिर बांधलं आहे असा शिलालेख भारतीय पुरातत्वशास्त्र विभागाने या ठिकाणी लावला आहे. शिवाय हे मंदिर पांडवकालीन आहे अशीही अख्यायिका सांगितली जाते. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुमारे ६० ते ६५ किमी अंतरावर हे मंदिर आहे. कल्याण आणि डोंबिवली पासून हे मंदिर साधारण २० किमी अंतरावर आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात.