गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील कर्जत, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कर्जत तालुक्यातून वाहत अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात येणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कर्जतमध्ये उल्हास नदीची पातळी धोक्याच्या पातळीपासून अवघी २ मीटरने कमी आहे. तर बदलापुरात नदीची पाणी पातळी १४.१० मीटर पर्यंत पोहोचली आहे. बदलापुरात इशारा पातळी १६.५० मीटर तर धोका पातळी १७.५० मीटर इतकी आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली असली तरी अजून कसलाही धोका नाही.

रायगड जिल्ह्यातून कर्जत, नेरळ असा प्रवास करत उल्हास नदी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात येते. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास बदलापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. गेल्या तीन वर्षात तीनदा बदलापूर शहराला पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून असते. गेल्या काही दिवसांपासून ठाणे, रायगड जिल्ह्यात चांगला पाऊस बरसतो आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्जत तालुक्यातून येणाऱी उल्हास नदी पुढे बदलापुरातून कल्याणकडे जाते. कर्जत तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची गुरूवारी सकाळची पाणी पातळी ही ४६ मीटर इतकी होती. कर्जतमध्ये उल्हास नदीची इशारा पातळी ४८.१ मीटर असून धोका पातळी ४८.७७ इतकी आहे. तर बदलापुरात उल्हास नदीची गुरूवारी सकाळी नोंदवलेली पाणी पाळी १४.१० मीटर इतकी आहे. बदलापुरात इशारा पातळी १६.५० मीटर तर धोका पातळी १७.५० मीटर इतकी आहे. बदलापूर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मात्र अजूनही बदलापूर शहराला कोणताही धोका नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.