भगवान मंडलिक

कल्याण : राज्य सरकारने दुर्बल घटक, सामान्य नागरिकांना शिधावाटप दुकानाच्या माध्यमातून सण, उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा दोन महिने बंद राहणार आहे. मोफत पिशव्या, साड्या, शिधा वाटप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

दीड वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने १०० रुपये दर आकारून एक किलो साखर, अर्धा किलो रवा, मैदा, एक किलो तेल, चणाडाळ या वस्तूंचा संच तयार करून तो शिधावाटप दुकानातून लाभार्थींना सणाच्या काळात वाटप केला जात होता.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील फडके रोडवरील पाळणाघरात केंद्र चालकांकडून लहान मुलीचा छळ

आता होळी, गुढीपाडवा उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. आता आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशावरून लाभार्थींना शिधावाटप दुकानातून देण्यात येणारे वस्तूंचे संच आचारसंहिता संपेपर्यंत (७ जून) वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

होळी, गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप करण्याचे राज्य सरकारचे नियोजन होते. परंतु त्याला आता आचारसंहितेचा अडसर आला आहे.

सण, उत्सवात आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे घेतला जाईल. कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.- योगिता सत्यगिरीतालुका पुरवठा अधिकारी, शहापूर