ठाणे : वर्तकनगर येथील ठाणे महापालिकेच्या आनंदीबाई जोशी प्रसुतीगृहाचे रुग्णालयात रुपांतर केले जाण र आहे. २०१७ मध्ये या प्रसुतीगृहाला आग लागली होती. तेव्हापासून हे प्रसुतीगृह बंदावस्थेत होते. याठिकाणी आता १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या वाढली आहे. कळवा येथे ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून या रुग्णालयात प्रसुतीसाठी मोठ्याप्रमाणात महिला दाखल होतात. २०१७ मध्ये वर्तक नगर येथील आनंदीबाई प्रसुतीगृहाला आग लागली होती. त्यानंतर हे प्रसुतीगृह बंदावस्थेत होते. परंतु त्याचे कामकाज कोरस परिसरात सुरु होते. याठिकाणी दर महिन्याला ६० ते ७० प्रसुती होत आहेत. या प्रसुतीगृहाचे पुर्नबांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तळ अधिक तीन मजल्यापर्यंत, दुसऱ्या टप्यात चौथा आणि पाचवा मजल्या पर्यंत, तिसऱ्या टप्प्यातील सहा ते आठ मजल्यांचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या रुग्णालयाच्या कामासाठी राज्य शासनाकडून २२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
