करोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य सरकारने सण आणि उत्सवांवरील निर्बंध हटविल्यामुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असून शनिवारी ठाणे जिल्ह्यात १८ हजार १२६ गौरींचे धुमधडाक्यात आगमन झाले. यात उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ शहरात सर्वाधिक ४ हजार ४३६ गौरीचे आगमन झाले आहे.
हेही वाचा >>> उल्हासनगर : गणेशोत्सवात जुगार जोमात ; दोन दिवसात 39 जणांवर गुन्हे
गेले दोन वर्षे करोना संसर्गामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. निर्बंधांमुळे मिरवणुका काढण्यात आलेल्या नव्हत्या. यंदा सण आणि उत्सवांवरील निर्बंध हटविण्यात आल्यामुळे ठाणे जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे. संपुर्ण ठाणे जिल्ह्यात १४०५ सार्वजनिक तर, १ लाख ५८ हजार २५४ घरगुती गणेश मुर्तींचे आगमन झाले आहे. त्यात शहरी भागातील १ हजार ५३ सार्वजनिक तर, १ लाख ४१ हजार ६७० घरगुती तर ग्रामीण भागातील ३५२ सार्वजनिक तर, १६ हजार ५८४ घरगुती गणेश मुर्तींचा समावेश आहे. त्यापाठोपाठ शनिवारी ठाणे जिल्ह्यात १८ हजार १२६ गौराई मातेचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन झाले. त्यातील ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १२ हजार २६० गौरिंचा समावेश आहे. यामध्ये उल्हासनगर परि मंडळात सर्वाधिक ४ हजार ४३६, त्याखालोखाल कल्याण परिमंडळामध्ये ३ हजार ४६७, वागळे इस्टेट परिमंडळ मध्ये १ हजार ९७२, ठाणे शहर परिमंडळमध्ये १ हजार ८२५ आणि भिवंडी परिमंडळमध्ये ५६० गौरिंचा समावेश आहे. तर, ग्रामीण भागात ५ हजार ८६५ खासगी तर, दोन सार्वजनिक गौरींचे आगमन झाले आहे. सोमवारी गौरी- गणपतीचे विसर्जन होणार आहे.