बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे काळानुरूप जगण्याच्या पद्धती बदलतात. शहरातील वास्तुरचनेतही बदल होत असतात. पूर्वी चाळी होत्या. मग अपार्टमेंट आल्या. आता उंच मजल्यांची टॉवर संस्कृती उपनगरांमध्ये रुजताना दिसते. ऐतिहासिक कल्याण शहरातही अनेक मजली उंची गाठलेले टॉवर उभे राहिले आहेत. पूर्व विभागातील मोहन सृष्टी त्यापैकी एक. मात्र जगण्याची नवी पद्धत अनुसरताना येथील रहिवाशांनी चाळीतला एकमेकांप्रती असलेली स्नेहभावनाही जपली आहे..
आप्तस्वकीय अथवा नातेवाईकांपेक्षा शेजारी अधिक महत्त्वाचे, कारण अडी-अडचणीच्या वेळी तेच आधी मदतीला धावून येतात. त्यामुळे गेल्या जमान्यातील चाळसंस्कृतीत मोठय़ा कसोशीने शेजारधर्माचे पालन होत होते. अपार्टमेंट अथवा टॉवर संस्कृतीत शेजाऱ्यांशी फारसा संवाद राहिला नसला तरी ‘काही ठिकाणी एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’च्या खुणा दिसतात. वास्तुरचना, जगण्याच्या पद्धती बदलल्या तरी एकमेकांविषयी मनात आस्थेचा ओलावा कायम असल्याचे दिसून येते. कल्याण पूर्व येथील मोहन सृष्टी ही सोसायटी त्यापैकी एक आहे. त्यामुळे इथे आपल्याला चाळीत आल्यासारखे वाटते.
कल्याण पूर्वमधील ही मोहन सृष्टी आपल्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे चटकन लक्ष वेधून घेते. चार उंच इमारतींचे हे संकुल आहे. तेजस, आकाश, सृष्टी आणि पवन अशा चार सृष्टीशी निगडित नावे असलेल्या इमारतींचा त्यात समावेश आहे. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खाडी असणाऱ्या या सोसायटीच्या मुख्य दरवाजामधून आत शिरल्यानंतरच छान गार वाटते. तेजस आणि पवन या इमारती १४ मजल्यांचा आहेत. भूमी १३ आणि आकाश ६ मजल्यांची आहे. या सर्व इमारती मिळून २०० बिऱ्हाडे या सोसायटीत आहेत. या सोसायटीला दोन प्रवेशद्वार असून एक दार कायम बंद असते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था उत्तम राहते. सोसायटीच्या आतमध्ये सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. या बगिच्यामध्ये संध्याकाळी आजी-आजोबा चालायला येतात. लहान मुलांसाठीही खेळण्याची उत्तम सोय केली आहे. इथे एक मंदिरही आहे. या मंदिरात सगळे सणवार मोठय़ा हौसेने साजरे केले जातात. पाच दिवसांचे गणपती, नवरात्र, दिवाळी, ईद, ख्रिसमस, ओनम, आयप्पा पूजा आदी सर्व प्रकारचे सण येथे साजरे केले जातात. त्यामुळे ‘वेगवेगळी माती जरी ही एकच आहे भूमी, हिंदू मुस्लीम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही’ या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सण साजरे करण्यासाठी सोसायटीतील सभासदांकडून वर्गणी काढली जाते. मात्र ज्या सभासदांना स्वत:हून पैसे द्यायचे असतात, त्यांच्याकडूनच पैसे घेतले जातात. त्यासाठी कोणत्याही सभासदावर जोरजबरदस्ती केली जात नाही. सोसायटीच्या कामासाठी एक छोटे कार्यालय आहे. या कार्यालयात झेरॉक्स यंत्रापासून वायफाय सेवेपर्यंत सर्व अद्ययावत सुविधा आहेत. त्यामुळे सोसायटीतील एखाद्या सदस्याचे सोसायटीतील कागदपत्रांसंदर्भात काही काम असेल तर त्याला झेरॉक्ससाठी दूर जावे लागत नाही. प्रत्येक कामाला इथे वेगवेगळी माणसे नेमण्यात आली आहेत. बगीचा स्वच्छ राहावा यासाठी एका सेवकाची नेमणूक करण्यात आली आहे. परिसर स्वच्छ राहावा यासाठी वेगळी माणसे नेमण्यात आली आहेत. ही सर्वच माणसे सोसायटीचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे सणावाराला या सर्वानाच आम्ही सामील करून घेत असल्याचे सदस्यांनी सांगितले. सोसायटीत २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणांच्या दिवशी ध्वजवंदन केले जाते. त्यानंतर लहान मुलांच्या गाण्यांच्या, नृत्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. सोसायटीच्या आवारात बास्केटबॉल कोर्टही उभारण्यात आला आहे. तिथेही टेबल टेनिससारख्या अनेक खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. ऊर्जेचा वापर कमी व्हावा यासाठी सोसायटीच्या आवारात एलईडी दिव्यांची सोय करण्यात आली आहे. डीम कन्व्हेअन्स करण्याचे काम सुरू असून सोसायटीच्या कागदपत्रांबाबत कोणतीही दिरंगाई करत नसल्याचे सोसायटीचे सदस्य पवन गुप्ता, यशवंत शहा, उग्रसेन सिंग आणि रवींद्र राणे यांनी सांगितले. दर पाच वर्षांनी निवडणुकीद्वारे सोसायटीची कार्यकारिणी निवडली जाते. सुरक्षेची सोय म्हणून येथे नऊ सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. परिसर स्वच्छ राहावा यासाठी कचऱ्याचेही नियोजन केले जाते. कचरा नगरपलिकेच्या घंटा गाडीतच टाकला जातो. कधी गाडी आली नाही तर फोन करून गाडी बोलावून घेतली जात असल्याची माहिती सदस्यांनी दिली. सोसायटीतील उपक्रम आणि योजनांचे निर्णय सर्व संमतीने घेतले जातात. पुढील वर्षांत सेन्सर दिवे लावण्याची कल्पना काही सदस्यांनी मांडली आहे. त्यामुळे सोसायटीच्या वीज बिलात बचत होणार आहे. एखादा माणूस रात्री दरवाजातून प्रवेश करेल तेव्हाच हे दिवे चालू होतील. लवकरच हे दिवे लावण्याचा प्रस्ताव सोसायटीतील सदस्यांसमोर मांडण्यात येणार आहेत. सर्व मिळूनच हा निर्णय घेणार असल्याचे गुप्ता यांनी आवर्जून नमूद केले. इमारतीत असणारे दुकानदारही प्रत्येक प्रकल्पात सहभागी होतात. तसेच पैशांचीही मदत करत असल्याचे सदस्यांनी सांगितले.
रस्त्याची डागडुगी आवश्यक
पत्री पुलाकडून येणारा रस्ता थोडा खराब आहे. या रस्त्याची डागडुगी करणे आवश्यक आहे. त्यामुळे रहिवाशांना मुख्य रस्त्यावर येणे-जाणे सोयीचे होणार आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. संकुलाजवळच मोहन सृष्टी नावाचाच बस स्टॉप झाल्याने नोकरदारांना रेल्वे स्थानक गाठणे सोयीचे झाले आहे. जवळच डॉन बॉस्को शाळा आहे. परिसर शांत असल्याने सोसायटीतल्या सदस्यांना दिवसभराच्या दगदगीनंतर घरात आल्यावर शांतता मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात उभी असलेली ही इमारत अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहेच, पण येथील नागरिकही सुखी समाधानी आहेत. त्यामुळे एका गुण्यागोविंदाने नांदत्या वस्तीत आल्याचा आनंद मिळतो.
- सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
- वीज बचतीसाठी एलईडी दिवे
- स्वच्छ, सुंदर, नेटका परिसर
- बगीचा, खेळांची साधने
- संकुलालगत बसथांबा