महिला दिन नुकताच उत्साहात साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून अनेक सामाजिक संस्थांनी कर्तृत्वान महिलांना त्यांच्या कार्याचा गौरव करीत सन्मानित केले. तसेच शहरातील दुकानवाल्यांनीही अनेक सवलतीच्या ऑफर्स देऊन महिलांना खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. सामाजिक क्षेत्र असो किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या महिला असोत, एकंदरीतच शहरात हा दिवस महिलांनी एन्जॉय केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. महिला दिन हा खरे तर रोजच असतो, किंबहुना असला पाहिजे. आज महिला स्वत:च्या पायावर उभे राहून संसाराचा गाडा हाकत आहेत, स्वबळावर आपला संसार चालवीत आहेत, महिलांचा हा सन्मान एका दिवसापुरता न राहता तो कायम समाजाच्या मनात असला पाहिजे असा निश्चय जर प्रत्येकाने केला तर समाजात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार यांना निश्चितच आळा बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी ठाण्यात महिला वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. एक महिला पोलीस जी सरकारी नोकरीत आहे, आणि ती रस्त्यावर आपले कर्तव्य बजावून समाजाला शिस्तीचा किंबहुना कायद्याचे पालन करण्याचा सल्ला देत असताना तिला मारहाण होणे किंवा लोकलमध्ये एकटय़ा-दुकटय़ा महिलेवर होत असलेले अतिप्रसंग ऐकायला मिळतात, हा महिलेचा सन्मान आहे की अपमान, हा प्रश्न निश्चितच मनात येतो. एकीकडे गेला आठवडाभर महिला दिन साजरा होतो आहे. आज महिला अबला नसून सबला आहे, हे वाक्य या आठवडाभरात अनेकदा ऐकायला मिळाले; परंतु जेव्हा असे प्रसंग घडतात, तेव्हा मात्र सबला असलेल्या या महिलांना मदतीचा हात देण्यासही सहसा कोणी पुढे येत नाही. क्वचितच काही जणी या प्रसंगाला हिमतीने तोंड देतात, तेव्हा मात्र खरोखरच सर्व समाज तिचे कौतुक करतो, अशा काही महिलांनाही ठाण्यात सन्मानित करण्यात आले.

अनेक महिला आज बचत गटाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी थेट ठाण्यात महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या ती महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्रातील विविध जिल्हय़ांतून येऊन या महिलांनी आपल्या उत्पादनांची विक्री केली. जशी दहा कोसांवर भाषा बदलते तसे पदार्थाची चवही बदलते. हाच पदार्थ शहरातील नागरिकांनाही चाखायला मिळावा व आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी इतकाच निखळ हेतू या महिला बचत गटाचा असल्याचे या प्रदर्शनादरम्यान पाहायला मिळाला.

एरवी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत काम करणाऱ्या सरकारी महिलांनाही दिवस एन्जॉय करता यावे यासाठी ठाणे महापालिकेनेही गडकरी रंगायतनमध्ये महिलांच्याच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच या महिलांसाठी गेला आठवडाभर वक्तृत्व, वेशभूषा, एकपात्री अभिनय, अतांक्षरी अशा स्पर्धाचे आयोजन केले होते. आपले काम सांभाळून महिला ही मोठय़ा उत्साहाने यात सहभागी झाल्या होत्या.

एकूणच महिला या आता प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत, उच्च पदावर काम करणाऱ्या महिला असोत, घरकाम करणाऱ्या किंवा कचरा वेचणाऱ्या महिला असोत, प्रत्येक जण आपल्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न करीत असतात. महिला दिन हा त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस असतो, कोणत्याही संस्थेने केलेला सत्कार हा त्यांना जगण्याचे बळ देत असतो, हेच बळ किंवा हाच सन्मान जेव्हा समाज महिलांना देईल तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on womens day special
First published on: 11-03-2016 at 02:11 IST