कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी अस्मिता जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कल्याण पंचायत समितीत कोणतेही पक्षीय राजकारण न करता भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष पदाधिकारी एकजुटीने काम करतात. त्यामुळे सभापती पदासाठी पक्षीय राजकारण, बहुमताचे राजकारण न करता प्रत्येक पक्ष सदस्यांची वर्णी लागेल असे नियोजन गेल्या १२ वर्षापासून करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>श्रीनगरमधील त्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

कल्याण पंचायत समितीमध्ये विविध पक्षांचे एकूण ११ सदस्य आहेत. यामध्ये अनिता वाघचौरे, अस्मिता जाधव, दर्शना जाधव, भारती टेंबे, रेश्मा भोईर, भाऊ गोंधळी, रमेश बांगर, पांडुरंग म्हात्रे, भरत भोईर, रंजना देशमुख, यशवंत दळवी यांचा समावेश आहे. सभापती पदासाठी वर्णी लागण्यासाठी यापूर्वी ठरलेल्या अलिखित नियमाप्रमाणे सभापती रेश्मा भोईर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन तहसीलदारांनी निवडणूक कार्यक्रम लावला होता. सभापती पदासाठी अस्मिता जाधव यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध नक्की झाली होती. तहसीलदार जयराम देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेप्रमाणे सभापती पदासाठी अस्मिता जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी त्यांना सहकार्य केले.

हेही वाचा >>> बनावट परवानग्यांद्वारे ‘रेरा’ प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल डोंबिवलीतील ३८ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचायत समितीमधील या खेळीमेळीच्या राजकारणामुळे कल्याण तालुक्यातील विकास कामे मार्गी लागतात. कोणतेही राजकीय वाद बैठकीत होत नाहीत. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होईल याकडे सर्व पक्षांचा कल असतो, असे समिती सदस्यांनी सांगितले.
सभापती अस्मिता जाधव यांचे आ. किसन कथोरे, आ. कुमार आयलानी यांनी स्वागत केले. तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आणि कृषी विषयक नवनवीन योजना राबविण्यासाठी प्रयत्न राहणार आहे, असे सभापती जाधव यांनी सांगितले.