Dahi handi utsav 2025 : ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी टेंभीनाका मित्र मंडळाच्या माध्यमातून टेंभीनाक्यावर दहीहंडी उत्सव सुरू केला. त्यांच्या निधनानंतर हा उत्सव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे नेण्याचे काम केले. शिंदे यांनी शनिवारी सकाळी या उत्सवाच्या ठिकाणी उपस्थिती लावत गोविंदा पथकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोले लगावत त्यांच्यावर टिकेचे बाण सोडले.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी टेंभीनाका येथे दहीहंडी उत्सव सुरु केला. याठिकाणी सर्वच गोविंदा पथके येऊन सलामी देऊन जातात आणि त्यांना मंडळाकडून बक्षिसे दिली जातात. या दहीहंडीला ठाण्याची मानाची आणि सोन्याची हंडी म्हणून ओळखले जाते. दिघे यांच्या उत्सवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सवाची परंपरा कायम ठेवली असून यंदाही या उत्सवाचे आयोजन करत शनिवारी दुपारी येथे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी गोविदा पथकांशी संवाद साधला.

धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर दहीहंडी उत्सव सुरू केला आणि तो संपूर्ण ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला. हा उत्सव आता सातारा समुद्र पलीकडे गेला आहे. यापुर्वी दहीहंडी बघण्यासाठी स्पेनवरून इकडे लोक यायचे. आता स्पेनची लोकं इथे येऊन गोविंदांसारखे थर लावतात. झेंडावंदच्या दिवशी शिवसेना शाखेजवळ त्यांनी असेच थर लावले. त्यामुळे ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे, असे शिंदे म्हणाले.

विधानसभेची दहीहंडी फोडली

धर्मवीर आनंद दिघे यांची हंडी मानाची हंडी, सोन्याची हंडी असे आपण म्हणतो. कारण, इथे सोन्यासारखी माणसे येतात. सोन्यासारखी माणसे म्हणजे गोविंद येतात. हेच आमचं सोनं आणि वैभव आहे, असे शिंदे म्हणाले. गेल्यावर्षी दहीहंडी उत्सवात सांगितले होते की, महायुतीच विधानसभेची हंडी फोडणार आहे आणि महायुतीनेच ही हंडी फोडली. २३२ थर लावून ही हंडी फोडली. तर, पाकिस्तानची हंडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोडली, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

विरोधकांवर टिका

गेल्या तीन वर्षांमध्ये विकासाचे थर लावून आम्ही विकासाची हंडी फोडली. विरोधकांनी विकास विरोधी थर लावून हंडी उभारली होती. पण, राज्यातील जनतेने त्यांची हंडी फोडून टाकली आणि त्यांना घरी पाठवून दिले. मुख्यमंत्री व्हायच्या आधी करोनाच्या नावाखाली दहीहंडी, गणपती तसेच इतर उत्सव बंद होते. परंतु मुख्यमंत्री होताच पहिला गोविंदा उत्सव सुरू केला. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांवरील बंदी हटवून ते साजरे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अशाच विकासाच्या हंड्या आपल्याला फोडून महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. या ठाण्यासह महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, असे शिंदे म्हणाले.