भाड्याने घर द्यायला नकार दिल्याने उल्हासनगरात एका वृद्ध महिलेला आणि तिच्या मुलाला तिघांनी बेदम मारहाण केली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात वृद्ध महिला आणि तिचा मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या महिनाभरात तीनही आरोपींनी तिसऱ्यांदा हल्ला केला. दोन्ही वेळा गुन्हा दाखल होऊनही तिसऱ्यांदा हल्ला झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

भाड्याने घर मागणारे दोघेही सराईत गुन्हेगार
उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील साधूबेला शाळेजवळच्या गिरधारी चाळीत उषा सिंग ही वृद्ध महिला आपल्या दोन मुलांसह राहते. तिच्या मालकीचे असलेले एक घर अजय आणि भरत पवार हे दोघे भाड्याने मागत होते. मात्र, हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांनी त्या परिसरात दहशत निर्माण केली होती. दहशतीच्या वातावरणामुळे उषा यांनी त्यांना भाड्याने रूम देण्यास स्पष्ट नकार दिला होता. भाड्याने घर दिल्यास भाडे मिळण्याची साशंकता होती. तसेच शहरातील घर बळकावण्याचे प्रकार पाहता आपले घरही बळकावले जाईल की काय अशी भीती उषा सिंग यांना होती. या भीतीपोटी उषा सिंग यांनी या दोघांना घर भाड्याने देण्यास नकार देत राहिली.

महिन्याभरात तिसऱ्यांदा हल्ला
याच रागातून या अजय पवार आणि भरत पवार या दोघांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने या वृद्ध महिलेवर हल्ला केला. तसेच तिच्या मुलावर चॉपरने हल्ला करून त्याला जखमी केले. महिन्याभरात तिसऱ्यांदा हा हल्ला झाल्याची माहिती या वृद्ध महिलेने दिली आहे. प्रत्येक मारहाणीच्या प्रकारानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा आरोपींनी उषा यांच्या मुलावर चॉपरने जीवघेणा हल्ला केला. सध्या दोघांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जखमींची चौकशी केली असून गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अशा गावगुंडांना चांगली अद्दल घडवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.